…हे गुजरातमध्ये होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही?; खासदार संभाजीराजे


मुंबई – खासदार संभाजीराजे भोसले यांनी गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे कौतुक केले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे स्मारक खरोखरीच सरदार पटेल यांचे कार्य जागतिक पातळीवर पोहोचवत आहे. नुकतीच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या तीन हजार कोटी रुपये खर्चून बनवलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली होती. संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर हे गुजरातमध्ये होऊ शकते, मग महाराष्ट्रात का नाही? असा सवालही केला आहे.


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला भेट दिल्यानंतर संभाजीराजे यांनी फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी गुजरात सरकारचे कौतुकही केले आहे. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या स्मारकास भेट दिली. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे स्मारक खरोखरीच सरदार पटेल यांचं कार्य जागतिक पातळीवर पोहोचवत असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे.


गुजरात सरकारने हे स्मारक साकारण्यासाठी मोठ्या निधीबरोबरच अफाट कल्पनाशक्तीही खर्च केली आहे, हे येथे आल्यावर जाणवते. केवळ पाच वर्षांत एवढे भव्य दिव्य स्मारक गुजरात सरकारने बांधून पूर्ण केले आहे, हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही संभाजीराजेंनी म्हटले आहे.