बनावट आणि स्पॅम खात्यांची संख्या कमी करण्यासाठी इन्स्टाग्राम आखत आहे योजना


मेटा मालकीचे फोटो-शेअरिंग अ‍ॅप इन्स्टाग्राम सोशल मीडियावर खूपच लोकप्रिय आहे. पण या अ‍ॅपवर गेल्या काही दिवसात बनावट खात्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामने यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बनावट आणि स्पॅम खात्यांची संख्या कमी करण्यासाठी इंस्टाग्राम योजना राबवत आहे. युजर्सचे खाते सत्यापित करण्यासाठी त्यांना चेहऱ्याचा सर्व बाजूने व्हिडिओ सेल्फी घेण्यास सांगितले जात आहे. गेल्यावर्षी कंपनीने याबाबतची चाचणी सुरु केली होती. पण ही मोहीम काही तांत्रिक अडचणींमुळे थंड पडली होती. आता इन्स्टाग्रामने पुन्हा एकदा ही मोहीम सुरु केली आहे.

व्हिडिओ रेकॉर्ड झाल्यानंतर युजर्संना ओळख पटवून देण्यासाठी व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर सबमिट करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर कधीही दिसणार नाही आणि ३० दिवसांच्या आत सर्व्हरवरून हटवला जाईल. दरम्यान, लोकांना मेटा-मालकीचा वापर करण्यापासून नियमित ब्रेक घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ‘टेक अ ब्रेक’ नावाच्या नव्या पर्यायाची चाचणी करत आहे. फोटो-शेअरिंग अ‍ॅप इन्स्टाग्रामचे प्रमुख अ‍ॅडम मॉसेरी यांच्या म्हणण्यानुसार, बहुप्रतिक्षित ‘टेक अ ब्रेक’ पर्याय वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर बराच वेळ घालवल्याची आठवण करून देईल.

डिसेंबरमध्ये ‘टेक अ ब्रेक’ हा पर्याय उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. इन्स्टाग्राम वापरकर्त्यांसाठी धोकादायक असल्याची टीका होत असतानाच हा नवीन पर्याय समोर आला आहे. तरुण लोकांच्या मानसिक आरोग्यावर लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप्स कसा विपरित परिणाम करू शकतात, असे अमेरिकन व्हिसलब्लोअर फ्रान्सिस हॉगेन यांनी उघड केले होते.