देशातील वृत्तवाहिन्यांसह प्रशासनाचे सरन्यायाधीशांनी टोचले कान!


नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील प्रदूषणाची समस्या गेल्या काही दिवसांपासून अधिकाधिक तीव्र होऊ लागली आहे. एकीकडे दिल्ली सरकारने वाढत्या प्रदूषणामुळे आणि दृष्यमानता कमी झाल्यामुळे २ दिवसांचा लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम अशा पर्यायांचा विचार सुरू केलेला असताना दुसरीकडे पंजाब, हरयाणामधील शेतकरी तण जाळत असल्याच्या मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये यावरून वाद सुरू झालेला असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रामण यांनी प्रशासनासोबतच प्रसारमाध्यमांचे देखील कान टोचले आहेत.

दरवर्षी या काळामध्ये पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी शेतातील अतिरिक्त ठरलेले तण जाळून टाकतात. पण, याचे प्रमाण एवढे मोठे असतं की त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषित झाल्याचे दिसून येते. याच कारणामुळे दिल्लीत देखील प्रदूषणाची पातळी अधिक गंभीर झाल्याचा दावा दिल्ली सरकारने केला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी सुरू असताना न्यायमूर्ती एन. व्ही. रामण यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

सरन्यायाधीश एन. व्ही. रामण यांनी यावेळी बोलताना केंद्राला अधिक कार्यक्षमपणे शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची अपेक्षा व्यक्त केली. शेतकऱ्यांना तण न जाळण्याविषयी केंद्र सरकारने समजावून सांगायला हवे. शेतकऱ्यांना आम्हाला शिक्षा द्यायची नाही. या शेतकऱ्यांनी किमान आठवडाभर तरी तण जाळू नये, यासाठी त्यांची समजूत घालण्याचे निर्देश आम्ही केंद्राला दिले असल्याचे न्यायमूर्ती रामण म्हणाले.

दरम्यान, सरन्यायाधीश एन. व्ही. रामण यांनी यावेळी वृत्तवाहिन्यांवर चालणाऱ्या चर्चांवर टिप्पणी केली. टीव्हीवर चालणाऱ्या चर्चा या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रदूषण करतात. तिथे प्रत्येकजण आपापला अजेंडा राबवत आहे. पण येथे आम्ही समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे रामण यांनी नमूद केले.

केंद्र सरकारची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील तुषार मेहता यांनी आज सुनावणी सुरू होताच वृत्तवाहिन्यांवर सुरू असलेल्या चर्चेविषयी नाराजी व्यक्त केली. एकूण प्रदूषणात तण जाळल्यामुळे फक्त ४ ते ७ टक्के भर पडते, अशी मी न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचे सांगत वृत्तवाहिन्यांवर आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य होत असल्याचे तुषार मेहता म्हणाले. पण आम्ही ऑक्टोबरनंतर तण जाळल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे जास्त भर पडत असून संपूर्ण वर्षभर ही परिस्थिती नसते असे म्हणालो असल्याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.

सरन्यायाधीश यावर बोलताना म्हणाले, अशा व्यक्ती आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. प्रदूषण कमी करणे हा आपला हेतू आहे. तुम्ही जेव्हा सार्वजनिक आयुष्यात असता, तेव्हा तुमच्यावर अशी टीका होणे अटळ असते. जेव्हा तुमचे हेतू स्पष्ट आहेत, तेव्हा या अशा टीकेचा परिणाम होत नाही. सोडून द्या.