पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल


पुणे- अलंकार पोलीस ठाण्यात मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पत्नीला मारहाण आणि मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे. स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय 29, रा. करिष्मा सोसायटी कोथरूड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

करियरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीने गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लोकांसमोर मारहाण करून अपमानास्पद वागणूक देत अतोनात छळ केल्याचेही स्नेहा विश्वासराव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आई-वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिकेत मूळचा मुंबईचा असून त्याचा आणि स्नेहा चव्हाणचा 2018 मध्ये विवाह झाला आहे. स्नेहा यादेखील अभिनेत्री असून त्यांनी काही मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून त्या दोघांमध्ये ही सतत वाद होत होते. यातूनच स्नेहा यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अलंकार पोलीस अधिक तपास करीत आहेत. अनिकेतने पोस्टर बॉईज, मस्का, बस स्टॉप या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनिकेतने अभिनयक्षेत्रातील पदार्पण नकळत सारे घडले या नाटकाद्वारे केले. तसेच त्याने ऊन-पाऊस आणि कळत नकळत या मालिकांमध्ये काम केले आहे.