रशियाचे अँटीसॅटलाईट मिसाईल परीक्षण, अंतराळ स्थानकाला होता धोका

रशियाने सोमवारी केलेल्या अँटीसॅटलाईट मिसाईल परीक्षणाने जगात एकच हडकंप माजला आहे. या मिसाईलने रशियाने त्यांचाच एक उपग्रह उडविला पण त्यामुळे अंतराळात मोठ्या प्रमाणावर मलबा पसरला आणि त्याचा थेट धोका आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला होता असे समजते. आपल्या अँटीसॅटलाईट मिसाईलची चाचणी रशियाने यशस्वी केली असली तरी त्यांच्या या बेजबाबदार वर्तनाने जगात त्यांच्याविरोधात रोष निर्माण झाला आहे.

नासाचे प्रमुख बिल नेल्सन या संदर्भात म्हणाले, रशियाच्या या चाचणी दरम्यान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील ७ अंतराळवीरांना या स्टेशनला लागून असलेल्या अंतराळ यानात दोन तास राहावे लागले. कारण अंतराळ स्थानक पृथ्वीच्या वर ४०२ किमी  असून रशियाने जेथे त्यांच्या उपग्रहावर अँटीसॅटलाईट मिसाईलचा मारा केला तेथून दर ९० मिनिटांनी हे स्थानक फेरी मारत असते. त्यामुळे अंतराळवीरांची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांना स्टेशनच्या आंत असलेल्या कॅप्सूल मध्ये जाण्यास सांगण्यात आले होते.रशियाच्या या चाचणीने अंतराळ कक्षेत मोठा मलबा पसरला असून पुढेही त्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण या कक्षेत फिरत असलेले अन्य उपग्रह आणि मलबा यात टक्कर होऊ शकते. रशियाच्या उपग्रहाचे किमान १५०० तुकडे झाले असून त्यामुळे ढग निर्माण झाले आहेत. या तुकड्यांची अन्य वस्तूंशी टक्कर झाली तर चेन रिअॅक्शन होऊन पृध्वी कक्षेत उलथापालथ होऊ शकते असे नासाचे म्हणणे आहे.

आजच्या युगात जगातील सर्व बडे देश सैन्या सह नागरी गरजा सेवांसाठी पूर्णपणे उपग्रहांवर अवलंबून आहेत. जगातल्या बड्या देशांमध्ये तर स्पर्धा निर्माण झाली असून युध्द परिस्थिती आलीच तर शत्रू देशाचे उपग्रह नष्ट करून त्यांचे संदेश दळणवळण पूर्णपणे कसे बंद पाडता येईल यासाठी अँटीसॅटलाईट मिसाईल चांचण्या केल्या जात आहेत. मात्र अजून कुठल्या देशाने शत्रूविरुद्ध या तंत्रज्ञानाचा वापर केलेला नाही.

अमेरीकेबरोबर रशिया, चीन आणि भारताने अँटीसॅटलाईट मिसाईलची यशस्वी परीक्षणे केली आहेत. अमेरिकेने ५० वर्षापूर्वीच अशी परीक्षणे केली होती. भारताने २०१९ मध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेत असलेल्या उपग्रहावर अशी चाचणी केली होती आणि ती यशस्वी झाली होती. अमेरिकेची सेना जगात आधुनिक मानली जाते. तिची सर्व ऑपरेशन्स उपग्रहांच्या माध्यमातून होतात. हे उपग्रह नष्ट झाले तर बँकिंग आणि जीपीएसवर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.