भाड्यावर सुद्धा मिळणार फ्लाइंग कार्स

काही काळापूर्वी उडती कार कवी कल्पना वाटत होती मात्र आता उडत्या कार्स सत्यात उतरल्या आहेत. भविष्यातील वाहतूक म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असताना जगात अनेक कंपन्या उडत्या कार्स बनवीत आहेत त्यातील काही कंपन्या अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. फ्लोरिडाची कंपनी लुफ्टकार (luftcar) त्यांची उडती कार २०२३ मध्ये लाँच करणार असल्याची घोषणा झाली असून सध्या ही कार दुबई एअरशो २०२१ मध्ये सामील झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या वाहनाला फ्लाईंग मोड्यूलशी जोडता येते. ६ प्रोपेलर असलेले हे वाहन ताशी ३५० किमीचा वेगाने जाऊ शकते आणि ४ हजार फुट उंचीवरून उडू शकते. एकावेळी ही कार २४० किमीचा प्रवास करू शकते. शिवाय ती आकाशात उडू शकते तशीच रस्त्यावरून सुद्धा धावू शकते. हायड्रोजन इंधनावर चालणारी ही कार पाच सीटर आहे. वाहतूक कोंडी, गर्दी यावर मात करून आकाशातून ती वेगाने प्रवास करू शकते. या कारची किंमत ३५०,००० डॉलर्स आहे.

कंपनीचे सीईओ संत सत्य सांगतात, एक छोटी कार आणि एक विमान अश्या संयुक्त स्वरुपात लोक तिचा वापर करू शकणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी राहणे, दुसऱ्या शहरात नोकरी किंवा कामासाठी जाणे यासाठी तिचा वापर सहज करता येईलच पण ज्यांना कार खरेदी परवडणार नाही त्यांना या कार भाड्याने सुद्धा मिळतील. शिवाय या कारचा वापर व्यवसायासाठी सुद्धा करता येईल. भारतात ही उडती कार लाँच होणार का नाही यासंदर्भात अजून घोषणा झालेली नाही.