परदेशी कर्मचाऱ्यांना दुबई देणार मल्टीपल एन्ट्री व्हिसा

संयुक्त अरब अमिरातीने आर्थिक स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी चालविलेल्या एक प्रयत्नाचा भाग म्हणून दुबईने परदेशी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक महत्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. अमिराती मध्ये असलेल्या कंपन्यात काम करत असलेल्या परदेशी कर्मचार्यांना दुबई मल्टीपल एन्ट्री व्हिसा जारी करणार आहे. हा व्हिसा पाच वर्षे मुदतीचा असेल. विशेष म्हणजे  ७ अमिरातींचा मिळून बनलेला महासंघ संयुक्त अरब अमिरातीनेही या आठवड्यात नवीन खासगी क्षेत्रासाठीच्या श्रम कायद्यात मोठा बदल केला आहे. यामुळे यापुढे श्रमिकांचे पासपोर्ट संबंधित कंपन्या जप्त करू शकणार नाहीत. फेब्रुवारी २०२२ पासून हे नियम लागू होत आहेत.

करोना मुळे संयुक्त अरब अमिरातीच्या अर्थव्यवस्थेला जगातील अन्य देशांप्रमाणेच मोठा फटका बसला आहे. अर्थव्यवस्था पुन्हा मूळपदावर यावी साठी गुंतवणूक व विदेशीना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यामुळेच दुबईने दीर्घ काळासाठी निवासी व्हिसासह आर्थिक व कायदे सुधारणा करण्यास सुरवात केली आहे. त्यातही प्रतिस्पर्धी सौदी अरेबियाला मागे टाकून मोठे व्यापारी केंद्र बनण्याचा युएईचा प्रयत्न आहे.

दुबईच्या या नव्या धोरणाचा फायदा लाखो भारतीयांना होणार आहे. कारण त्यामुळे कामासंबंधी केलेला करार संपुष्टात आल्यावर जबरदस्तीने युएई बाहेर जावे लागणार नाही. मल्टीपल एन्ट्री व्हिसामुळे दुबई स्थित कर्मचारी बैठका अथवा अन्य व्यावसायिक गरजांसाठी सहज अमिराती व बाहेर जाऊ शकणार आहे.