ट्वीटर पोलचा नुसार एलोन मस्क यांनी विकले टेस्लाचे ६.९ अब्ज डॉलर्सचे शेअर्स

अमेरिकन जायंट इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी टेस्लाचे ६.९ अब्ज डॉलर्स किमतीचे ५.१ दशलक्ष पेक्षा अधिक शेअर्स विकले आहेत. यापैकी ४.२ दशलक्ष शेअर्स एका ट्रस्ट मध्ये ठेवले गेले होते असे समजते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मस्क यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर टेस्लाचे शेअर्स त्यांनी विकावे कि नको अशी विचारणा युजर्सकडे केली होती आणि पोलचा जो निकाल येईल त्यानुसार कार्यवाही करणार असे जाहीर केले होते.

एलोन मस्क यांच्या टेस्लाचे बाजार मूल्य ऑक्टोबर २०२१ मध्ये १ ट्रिलीयन डॉलर्सवर पोहोचल्यावर त्यांनी हे पाउल उचलले होते. ट्वीटर पोल नंतर काही दिवसात मस्क यांनी शेअर्स विक्री केली आहे. ट्वीटरवर त्यांनी १० टक्के स्टॉक विकावा का यावर लोकांकडून मते मागविली होती. त्यासाठी ३५ लाख लोकानी मत नोंदविले आणि त्यातील ५८ टक्के लोकांनी शेअर्स विकावे या बाजूने कौल दिला असे समजते. मस्क यांनी शेअर विक्री केल्यावर टेस्ला शेअरची किंमत १५.४ टक्क्यांनी घसरली आहे.

ब्लूमबर्ग बिलीनेअर इंडेक्स नुसार एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्या कंपनीचे मूल्य २९४ अब्ज डॉलर्स आहे. अमेरिकन कॉंग्रेसच्या डेमोक्रॅटनी सुपर रिच लोकांवर जादा कर लावावा असा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार शेअर्स विकल्यानंतर कर भरावा लागणार असून मस्क यांना शेअर विक्रीवर १.४ अब्ज डॉलर्स कर भरावा लागेल असे अनुमान आहे.