अमेरिकेला मागे टाकून चीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश

जगाची महासत्ता अमेरिकेला प्रत्येक मोर्चावर मागे टाकत चाललेल्या चीनने आणखी एका बाबतीत अमेरिकेला मागे टाकून जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. जगातील देशाच्या अर्थसंकल्पावर नजर ठेवणारी मॅकेंझी मॅनेजमेंट कन्सल्टिंग फर्मच्या रिपोर्ट नुसार जगातील श्रीमंत देशांच्या यादीत अमेरिकेला मागे टाकून चीन ने पहिले स्थान मिळविले आहे. गेल्या २० वर्षात जगाची संपत्ती तिप्पट झाली असून त्यात चीनचा वाटा एक तृतीयांश इतका आहे. मात्र जगातील सर्वात श्रीमंत चीन आणि अमेरिकेच्या संपत्तीतील मोठा हिस्सा काही श्रीमंत व्यक्तीपुरता मर्यादित असल्याचे या रिपोर्ट मध्ये नमूद केले गेले आहे.

चीन आणि अमेरिका या दोन देशातील १० टक्के नागरिक सर्वाधिक श्रीमंत आहेत आणि या देशात श्रीमंत व्यक्तींची संख्या वेगाने वाढते आहे. यामुळे गरीब आणि श्रीमंत देशातील दरी अधिक रुंदावत चालली आहे. रिपोर्ट नुसार २००० साली जगाची एकूण संपत्ती १५६ खरब डॉलर्स होती टी २०२० मध्ये ५१४ खरब डॉलर्सवर गेली आहे. जगातील अनेक देश वेगाने श्रीमंत होत असून या संपत्तीत अचल संपत्तीचे प्रमाण ६८ टक्के आहे.

चीनची २००० साली ७ खरब डॉलर्स संपत्ती होती ती २०२० मध्ये १२० खरब डॉलर्सवर गेली आहे. चीन २००० साली प्रथम जागतिक व्यापार संघटनेत सामील झाला आणि तेव्हापासून चीनची अर्थव्यवस्था वेगाने वाढते आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था गेल्या २० वर्षात दुप्पट होऊन ९० खरब डॉलर्सवर गेली आहे. पण मालमत्तेचे दर अमेरिकेत फारसे वाढले नाहीत त्यामुळे चीनच्या तुलनेत देशाची संपत्ती कमी झाली आहे असे या अहवालात नोंदविले गेले आहे.