हार्दिक पंड्याची दोन घड्याळे कस्टम विभागाने केली जप्त

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत असे म्हणावे लागते आहे. मैदानावर फॉर्म साठी संघर्ष करत असलेल्या हार्दिकला मायदेशी परतल्यावर कस्टम विभागाचा दणका बसला आहे. रविवारी टीम इंडिया युएई मधील टी २० वर्ल्ड कप संपल्यावर मायदेशी परतली आहे. विमानतळावर हार्दिकजवळ असलेली दोन महागडी घड्याळे  कस्टम विभागाने जप्त केली असून या घड्याळांची किंमत पाच कोटी असल्याचे समजते.

मिडिया रिपोर्ट नुसार रविवारी टीम इंडियाबरोबर मायदेशी परतलेया हार्दिकने या घड्याळाबाबत काहीही सूचना दिली नव्हती. त्याच्याकडे या घड्याळांचे बिल नव्हते. तसेच कस्टम आयटम म्हणून त्याने ही घड्याळे सादर केली नव्हती. त्यामुळे कस्टम विभागाने  घड्याळे जप्त केली. हार्दिक यापूर्वी सुद्धा महागड्या घड्याळावरून चर्चेत आला आहे. त्याचे ५ कोटी किमतीचे एक घड्याळ अनेक दिवस चर्चेचा विषय बनले होते कारण त्याने या घड्याळासोबत त्याचे काही फोटो शेअर केले होते.

गतवर्षी हार्दिकचा भाऊ कुणाल यालाही दुबई वरून परत येताना मुंबई विमानतळावर सोने आणि अन्य काही किमती सामानासह अडविले गेले होते. कुणालने सोबत आणलेल्या सामानाची माहिती दिली नव्हती. त्यात १ कोटीचे सोने आणि काही महागडी घड्याळे होती.