२०२४ पासून विना चार्जर विकले जाणार स्मार्टफोन!
स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांना २०२४ पासून विना चार्जर फोन बॉक्स काढण्यासाठी मजबूर केले जाणार असल्याचे समजते. यासाठी नवीन नियम आणला जात आहे. युरोपियन आयोगाने काही काळापूर्वी एक प्रस्ताव सादर केला होता त्यात कॉमन चार्जरच स्मार्टफोन आणि अन्य डिव्हायसेस साठी काम करेल असे म्हटले होते. पण या नियमाचा भुर्दंड हाय एंड स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्सना बसेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे आयफोन ११ साठी बॉक्स मध्ये चार्जर नव्हता, तीच बाब आयफोन १२ साठी आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २१ सिरीज मधेही बॉक्स मधून चार्जर काढायची सुरवात झाली आहे. या कंपन्या ई वेस्ट कमी करण्याचे कारण त्यासाठी देत आहेत. पण नवीन नियमामुळे स्मार्टफोन, ई बुक रीडर, वायरलेस चार्जर, वायरलेस ईअरबड, पोर्टेबल स्पीकर व चार्जर आवश्यक असलेल्या सर्व डिव्हायसेसवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे स्मार्टफोन बॉक्स मध्ये चार्जर नसल्याने युजर्सना तो स्वतंत्रपणे विकत घ्यावा लागणार आहे. याचाच अर्थ युजर्सचा खिसा आणखी हलका होणार आहे. आयफोन ११ साठी चार्जर होता पण तो वेगळा विकत घ्यावा लागला याचा अनुभव युजर्सना आला आहेच.
अर्थात महागड्या स्मार्टफोनचा वापर न करणाऱ्या युजर्सवर त्याचा फारसा विपरीत परिणाम होणार नाही असे सांगितले जात आहे. मात्र पुढे जाऊन स्वस्त फोन सोबत येणारे चार्जर सुद्धा जर फोन बॉक्स मध्ये आले नाहीत तर या युजर्सवर सुद्धा स्वतंत्र चार्जर विकत घेण्याची वेळ येणार आहे. फोन बॉक्स मधुन ईअरफोन अगोदरच हटविले गेले आहेत आता चार्जर सुद्धा हटविले जाणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.