या देशाने अलगद बदलला राष्ट्रध्वजाचा रंग
प्रत्येक देशाचा राष्ट्रध्वज त्या त्या देशाची ओळख असते आणि नागरिकांना आपल्या झेंड्याचा प्रचंड अभिमान असतो. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धात देशाच्या ध्वजावरूनचा त्या त्या खेळाडूंची ओळख पटत असते. फ्रांस या देशाचे राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मँक्रो यांनी देशाच्या ध्वजाचा रंग बदलला असून हा बदल अगदी अलगद करण्यात आला आहे. आता फ्रांसच्या अधिकृत राष्ट्रध्वजावर गडद निळ्या रंगाचा वापर केला गेला असून या रंगाने पूर्वीच्या चमकत्या निळ्या रंगाची जागा घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मँक्रो यांनी देशाच्या ध्वजाचा रंग बदलायचा असा निश्चय केला होता आणि आत्ता हा ध्वज १७९३ मध्ये जसा होता त्या रंगाचा झाला आहे. हा गडद निळा रंग फ्रेंच क्रांतीचे प्रतिक आहे.
ध्वजाच्या निळ्या रंगातील हा बदल सरकारात वादाचा विषय बनला होता. काही नेत्यांनी नवा निळा रंग कुरूप असल्याचे मत नोंदविले होते पण मँक्रो यांनी मात्र हाच रंग अधिक शानदार असल्याचे सांगून नवा रंग झेंड्यात सामील केला. नवा झेंडा एलिसी पॅलेस, संसद सहित राजधानीतील सर्व सरकारी भवनांवर लावला गेला आहे.
१७९० च्या दशकात फ्रेंच क्रांती मध्ये १७९२ मध्ये या झेंड्याचा प्रथम वापर केला गेला होता. त्यावेळी फ्रांस गणराज्य स्थापना झाली होती. हा ध्वज जॅक्स लुई डेव्हिस यांनी डिझाईन केला होता. १७९४ मध्ये त्याला अधिकृतपणे राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली गेली होती. निळा, लाल हे पॅरीस चे पारंपारिक रंग फ्रेंच राज्यक्रांती मध्ये वापरले गेले पण देश स्थापना झाल्यावर प्रतीकाचे राष्ट्रीयीकरण करण्यासाठी त्यात पांढरा रंग जोडला गेला. क्रांतिकारी आदर्श तीन वाक्ये, तीन तत्वे यांचे प्रतिनिधी म्हणून हे तीन रंग वापरले गेले होते. निळा रंग स्वातंत्र्याचा, पांढरा समानतेचा आणि लाल बंधुत्वाचा अशी ही प्रतीके आहेत.