जगातील सर्वाधिक उंचीवरचा अनोखा पब

पृथ्वीवर आश्चर्यांची कमतरता नाही. फक्त डोळे उघडे ठेऊन पाहायला हवे. जगाच्या अत्यंत दुर्गम भागात सुद्धा अशी काही सुंदर आणि अनोखी स्थळे आहेत, जी पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. यातीलच एक आहे आयरिश पब. नाव आयरिश असे असले तरी हा पब आहे नेपाल मध्ये आणि तो जगातील सर्वाधिक उंचीवरचा पब म्हणून ओळखला जातो. नेपालमधील नामचे या सुंदर गावापासून येथे जाता येते, नामचे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या पब मधून नामचे गावाचे सौंदर्य डोळे भरून न्याहाळता येते. विशेष म्हणजे हे नामचे गाव प्रसिद्ध एव्हरेस्ट शिखराच्या वाटेवर आहे.

या आयरिश पबची समुद्रसपाटी पासूनची उंची ३४५० मीटर म्हणजे सुमारे तीन किलोमीटर (साधारण ११ हजार फुट) आहे. एव्हरेस्ट चढाई साठी येणाऱ्या गिर्यारोहकांचा येथे जमावडा असतो. मस्ती, मौजेत रममाण झालेले जगभरातील गिर्यारोहक येथे येतात तसेच पर्यटक सुद्धा येतात. गेल्या वर्षी करोना मुळे हा पब एप्रिल मध्ये बंद केला गेला होता पण आता तो पुन्हा उघडला गेला आहे. या पब साठी लागणारे सामान काठमांडू पासून लुकला पर्यंत विमानातून आणले जाते आणि त्यानंतर पोर्टर समान घेऊन वर चढतात. जगाच्या विविध भागागून येथे येणाऱ्या गिर्यारोहाकांच्या पहाड चढणीच्या कथा ऐकण्यासारख्या असतात.

२०१५ मध्ये नेपाल मध्ये झालेल्या महाभयंकर भूकंपात या पबचे मोठे नुकसान झाले होते. त्यातून सावरत नाही तो करोनाचे संकट आले. पण आता पुन्हा एकदा हा पब स्वागतासाठी सज्ज झाला आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्पवरचे खूप लोक येथे केवळ नामचे गावाचे सौंदर्य वरून पाहता यावे यासाठी येथे येतात असेही सांगितले जाते.