तुमचा प्रश्न चर्चा करुनच सुटणार ; अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन


मुंबई – आता नवीन समिती नेमण्याची मागणी उच्च न्यायालयात विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या नेत्यांनी केली आहे. कर्मचारी संघटनेने उच्च न्यायालयात सरकारने नेमलेल्या समितीवर विश्वास नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत अहवाल देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीची समिती स्थापन करा, अशी मागणी केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

उच्च न्यायालयासमोर हे प्रकरण आहे. योग्य तो निर्णय उच्च न्यायालय याबाबत देईल, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे. कामगारांना मी सांगितले आहे की हा प्रश्न चर्चा करुनच सुटणार आहे. जे आदेश न्यायालयाने दिले आहेत, त्याचे आम्ही पालन करु. कर्मचाऱ्यांना मी अनेक दिवसांपासून सांगत आहे की कामावर या आणि आपण चर्चा करु, असे अनिल परब म्हणाले.

आपले म्हणणे प्रत्येकाने मांडले आहे. उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर यावर भाष्य करणे योग्य राहील, असे अनिल परब म्हणाले. निदर्शने करणे प्रत्येकाचा अधिकार आहे, पण न्यायालयाच्या समोर आम्ही आत्मदहन करु, असे सांगणे हे न्यायालयाला धमकी देण्यासारखे असल्याचे मला वाटते. पण धमकी देऊन न्याय मिळत नाही. न्याय न्यायालयीन मार्गाने मागावा. उच्च न्यायालयात आपली बाजू मांडावी आणि न्यायालय जो आदेश देईल त्याचे सर्वांनी पालन केले पाहिजे, असे अनिल परब यांनी म्हटले.