उदयनराजेंची सरकारला बाबासाहेब पुरंदरेंची ‘ती’ इच्छा पूर्ण करण्याची विनंती


पुणे – आज पहाटे पुण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. राज्यासह देशभरातील अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली आहे. आज बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना साताऱ्याचे माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी यावेळी पुरंदरेंबद्दलच्या भावना व्यक्त करत त्यांची एक इच्छा पूर्ण करण्याची मागणीही सरकारकडे केली आहे.

आज पुण्यात उदयनराजेंनी बाबासाहेबांच्या पर्वती येथील घरी येऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, आमच्या कुटुंबातील एक घटक आदरणीय सन्माननीय, पूज्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली न भरुन येणारी ही पोकळी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यात मी आणि माझे सर्व कुटुंबीय सहभागी आहोत. मी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो.

याबरोबरच त्यांनी सरकारकडे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची एक इच्छा लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंतीही केली. ते म्हणाले, अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांच्या सहकाऱ्यामुळे शिवप्रेमींच्या स्वप्नातील शिवसृष्टीच्या निर्माणाला सुरुवात झाली. राज्य शासनाला, केंद्र शासनाला तसेच जे कोणी पदाधिकारी आहेत, त्यांना मी विनंती करतो की, त्यांची ही इच्छा, फक्त त्यांचीच नव्हे तर ज्या कोणाचे शिवाजी महाराजांवर प्रेम आहे, जे त्यांना गुरुस्थानी मानतात त्यांची ही शिवसृष्टी लवकरात लवकर पूर्ण होण्याकरिता आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावा.