यामुळे राज्यातील इंधनाचे दर कमी होणार नाही – अजित पवार


पंढरपूर – केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी इंधनावरील दर कमी केल्यामुळे पेट्रोल १० आणि डिझेल हे ५ रुपयांनी स्वस्त झाले. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयापाठोपाठ अनेक राज्यांनी विशेषतः भाजपशासित राज्यांनी इंधनावरील व्हॅट (मूल्यवर्धित कर) कमी केला. तेव्हा शंभरी पार कलेले पेट्रोल आणि डिझेलचे दर हे काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र देशभर पाहायला मिळाले. असं असताना महाराष्ट्रातही इंधनावरील दर कधी आणि किती रुपयांनी कमी केले जातात, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते.

आज सकाळी पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित वापर हे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना राज्य शासनाची इंधनाचे दर कमी करण्याबाबतची भुमिका स्पष्ट केली. राज्याकडे दुसरे उत्पन्नाचं साधन नाही, महाराष्ट्राला माहिती देतो की रोज ४५० कोटी रुपये हे पगार-पेन्शनला द्यावे लागतात, हा खर्च महिन्यातील दीड लाख कोटी रुपयांच्या पुढचा आहे, हा कुठेच थांबलेला नाही. तो करावाच लागतो. काही गोष्टी या अशा असतात की त्या थांबवता येत नसल्याचे सांगत इंधनाचे दर येत्या काळात कमी करण्याचा राज्य शासनाचा कोणताही विचार नसल्याचा सूर अजित पवार यांनी लावला. एकंदरितच कोरोना काळ आणि टाळेबंदी, कोरोना उपचारांवर झालेला खर्च, इतर विभागांच्या खर्चाला लागलेली कात्री या सर्वांमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असताना इंधन दर कपात करणे, राज्य सरकारला सध्या परवडणारे नसल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्याने इंधनाचे दर कमी करावे ही मागणी विरोधी पक्ष भाजप गेले काही दिवस करत आहे, सातत्याने आंदोलन करत आहे, महाविकास आघाडीवर टीका करत आला आहे. आता भाजप येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पाश्वर्भुमिवर काय भुमिका घेणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल.