पंजाब विधानसभेची निवडणूक लढवणार सोनू सूदची बहिण


अमृतसर – आगामी वर्षात पंजाब विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. अभिनेता सोनू सूद कोरोना काळात गरिबांसाठी ‘मसिहॉं’ बनला होता. देशात एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक मदतीसाठी सैरावैरा भटकत होते, तर दुसरीकडे अभिनेता सोनू सूद अशा लोकांसाठी अगदी देवदूतासारखा मदतीसाठी धावून आला होता. यानंतर सोनू सूदला काही राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. पण आता सोनू सूदने ही ऑफर नाकारली आहे. नुकतीच पत्रकार परिषद घेत त्याने याबाबतची माहिती दिली आहे.

पंजाब विधानसभा निवडणूक लढवण्यास बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने नकार दिला आहे. पण त्याची बहीण मालविका सूद आता सच्चर या पंजाब निवडणूक लढवणार आहे. पण कोणत्या पक्षातून, कोणत्या मतदारसंघातून मालविका निवडणूक लढवणार हे अद्याप समोर आलेले नाही. नुकतीच एक पत्रकार परिषद घेत सोनूने याबाबतची घोषणा केली आहे. मालविकाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सट्टेबाजीला सुरुवात झाली आहे.

मालविका आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा एकत्र फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये मालविकासोबत सोनू सूदही उपस्थित होता. तर दुसरीकडे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन ‘पंजाब लोक काँग्रेस’या नव्या पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे आता मालविका ही त्यांच्या पक्षातून निवडणूक लढणार का? यासारख्या चर्चा उपस्थित होत आहेत.

दरम्यान कोरोना काळात मालविकाने सोनू सूदसोबत लोकांची मदत केली होती. त्यांनी यंदा जूनमध्ये राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. राजकारणात मला यायला हरकत नाही, पण आता मला जनसेवेचा विस्तार करायचा असल्याचे मालविका म्हणाली होती. मी अजूनही सोनू सूदसोबत पीडितांना मदत करत आहे.