म्हैस दुध देत नाही म्हणून या पठ्ठ्याने गाठले चक्क पोलीस स्टेशन


भोपाळ – मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून जेथील एक शेतकरी आपल्या म्हशीने दूध न दिल्यामुळे नाराज झाला आणि आपली समस्या घेऊन त्याने पोलीस स्टेशन गाठले. भिंडच्या नयागाव पोलीस ठाण्याचे अधिकारी याबाबत माहिती देताना म्हणाले की, शेतकरी आपल्या म्हशीसह अर्ज सादर केल्यानंतर सुमारे चार तासांनी पोलीस ठाण्यात आला आणि त्यानंतर मदत मागितली.

याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक अरविंद शहा म्हणाले, आपली म्हैस गेल्या काही दिवसांपासून दूध देत नसल्याची तक्रार बाबुलाल जाटव यांनी नयागाव पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांनी सांगितले की, तक्रारदार बाबूलाल जाटव यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना काही गावकऱ्यांनी सांगितले की, म्हैस जादूटोण्याच्या प्रभावाखाली आहे आणि त्यामुळे तिने दूध देणे बंद केले आहे.

स्टेशन प्रभारी हरजेंद्रसिंग चौहान यांच्याकडे तक्रारदार बाबूलाल जाटव यांनी दाद मागितली आणि सांगितले की, साहेब! आमची म्हैस दूध देत नाही. माझी म्हैस पूर्वी रोज पाच ते साडेपाच लिटर दूध द्यायची. त्यामुळे पोलिसांनी मला दूध काढण्यात मदत करावी अशी माझी इच्छा आहे. मला पोलिसांनी मदत केली, तर मी तुमचा सदैव ऋणी राहीन.

अरविंद शहा म्हणाले, स्टेशन प्रभारींना मी गावकऱ्याला पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले होते. स्टेशन प्रभारी हरजेंद्र सिंह चौहान यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांशी चर्चा केली आणि डॉक्टरांनी काही टिप्स दिल्या. स्टेशन प्रभारींनी बाबूलाल यांना हीच सूचना सांगितली आणि त्या आधारे बाबूरामने दूध काढले, तेव्हा म्हशीने दूध काढण्यास परवानगी दिली.

स्टेशन प्रभारी म्हणाले, तक्रारदाराने यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांचे आभार मानत त्यांनी सांगितले की, म्हशीने रविवारी सकाळपासून पुन्हा दूध देण्यास सुरुवात केली आहे. यानंतर त्यांनी बाबुलाल यांना जनावरांना होणारे आजार किंवा इतर समस्यांबाबत पोलिसांशी नाही, तर प्राणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यास सांगितले.