शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर शरद पवार यांनी व्यक्त केला शोक


मुंबई – पुण्यात आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. बाबासाहेब पुरंदरेंवर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, त्यांची प्राणज्योत उपचारादरम्यानच मालवली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर शोक व्यक्त केला. शरद पवार यांनी म्हटले आहे की, आज आपल्यात महाराष्ट्राच्या नव्या पिढीला इतिहास साध्या भाषेत सांगणारे, शेकडो व्याख्यान देणारे बाबासाहेब पुरंदरे नाहीत. ते दीर्घायुषी होते, वयाची 100 वर्षे त्यांनी पूर्ण केली. ते लोकांच्या कायम संपर्कात होते. अस्वस्थता, दुःख अनेकांच्या मनात आहे. त्यांनी शिवछत्रपतींचा इतिहास ठेवला. त्यात काही वादग्रस्त मुद्दे होते. मी त्यावर बोलायला जाणकार नाही. इतिहासाच्या संदर्भात आस्था निर्माण करण्याचे मोठे कार्य बाबासाहेबांनी केले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

पवार यांनी पुढे म्हटले आहे की, त्यांनी नव्या पिढीला पूर्वजांचा इतिहास अत्यंत साध्या भाषेत सांगत इतिहासासंदर्भात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेकडो व्याख्याने दिली. नव्या पिढीमध्ये या विषयासंबंधी आस्था निर्माण करण्यासाठी योगदान देणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यामध्ये नाहीत.

बाबासाहेबांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वाची ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास अभ्यासक, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन ही मोठी हानी आहे. त्यांचे महाराष्ट्रातील गड-किल्ले, महाराष्ट्राचा इतिहास यांच्याबद्दल आस्था असलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी लेखन, व्याख्यान, ‘जाणता राजा’ सारख्या महानाट्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला आहे. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी दिवंगत बाबासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.