अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चा दमदार टीझर रिलीज


दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट रिलीज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगले यश मिळाले असून प्रेक्षकांची देखील चित्रपटाला मोठी पसंती मिळाली आहे. सगळीकडेच ‘सूर्यवंशी’ची चर्चा सुरु असताना अक्षयच्या बहुप्रतिक्षित ‘पृथ्वीराज’ चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर रिलीज होताच सोशल मीडियावर या टीझरला तुफान पसंती मिळत आहे.

महान भारतीय सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या आयुष्यावर आधारित ‘पृथ्वीराज’ चित्रपट असून अक्षय या चित्रपटात पृथ्वीराज चौहान ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटातून अभिनेत्री मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीची भूमिका साकारते. चित्रपटात त्याच्यासोबतच संजय दत्त, सोनू सूद आणि आशुतोष राणा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

या चित्रपटाची भव्यता चित्रपटाच्या टीझरवरूनच लक्षात येते. टीझरमधील युद्धभूमीवर सज्ज असलेले योद्धे, पेटलेले रणांगण आणि दमदार डायलॉग प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. येत्या नव्या वर्षात म्हणजेच २१ जानेवारी २०२२ ला चित्रपट रिलीज होणार आहे.

अक्षय कुमार येत्या नव्या वर्षात प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. ‘पृथ्वीराज’ चित्रपटासोबतच तो ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’, ‘राम सेतु’, ‘रक्षा बंधन’, ‘मिशन सिंड्रेला’ आणि ‘ओ माय गॉड’ या चित्रपटांमधून विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.