प्रज्ञा सातव यांना काँग्रेस विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता


नवी दिल्ली : काँग्रेस विधानपरिषदेवर दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव यांना पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रज्ञा सातव यांना शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त जागेवर उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची देखील माहिती आहे. या विधानपरिषदेची मुदत जुलै 2024 पर्यंत आहे. या जागेवर जर निवड झाली, तर राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नीकडे जाणार आहे.

चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे यांच्याही नावाची या रिक्त झालेल्या जागेसाठी चर्चा सुरु होती. एकाच जागेसाठी निवडणूक असल्यामुळे महाविकासआघाडीसाठी ही निवडणूक फारशी अवघड नाही. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी 29 नोव्हेंबरला निवडणूक अपेक्षित आहे. अर्ज भरण्याची 16 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे.

काँग्रेसने विधानपरिषदेत शरद रणपिसे यांच्या रुपाने अनुसूचित जातीचे नेतृत्व दिले होते. त्यामुळे ही जागा या समाजालाच मिळावी, असा तर्क करत काँग्रेसमध्ये काही इच्छुक सरसावले आहेत. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर नुकतेच जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त झालेले जितेंद्र देहाडे हे इच्छुकांच्या शर्यतीत होते. काँग्रेसचे गटनेते म्हणून विधानपरिषदेत रणपिसे काम पाहत होते. त्यांच्या निधनानंतर परिषदेत अनुसूचित जातींचा एकही आमदार नाही, त्यामुळे ही जागा एससी समाजालाच मिळावी, असा आग्रह काहींनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती मिळत आहे.

त्याचबरोबर विधानपरिषदेसाठी काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावाचा विचार होतो का याचीही उत्सुकता होती. राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठीही त्यांच्या नावाची चर्चा होती. पण राज्यसभा खासदारकी रजनीताई पाटील यांना देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला. त्यामुळे राज्यात विधानपरिषदेच्या माध्यमातून सातव कुटुंबाला भविष्यातील राजकारणासाठी ताकद दिली जाते का याचीही उत्सुकता होती. शेवटी प्रज्ञा सातव यांनाच संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे. या एका जागेची निवड आमदारांमधून होणार असल्यामुळे आणि महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यामुळे काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. शरद रणपिसे यांच्या निधनानंतरची उर्वरित चार वर्षांची टर्म म्हणजे 27 जुलै 2024 पर्यंतची टर्म नव्याने निवडून आलेल्या आमदारास मिळणार आहे.