कंगनाच्या त्या वक्तव्यावर ओवेसी संतापले


नवी दिल्ली – एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना अभिनेत्री कंगना राणावतने भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. कंगनाच्या या वक्तव्यावरून तिच्या खूप टीका झाली. तसेच तिचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा, अशीदेखील मागणी होत होती. दरम्यान, एमआयएम प्रमुख असुद्दीन ओवेसींनी कंगनाच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच कंगनाने केलेले वक्तव्य जर एखाद्या मुस्लिमाने केले असते, तर युएपीए अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली असती, तसेच पायावर गोळी झाडत तुरुंगात रवानगी करण्यात आली असती, असे ओवेसी म्हणाले.


“ती ‘क्वीन’ आहे आणि तुम्ही येथील राजे आहात, त्यामुळे तिच्यावर तुम्ही कारवाई करणार नसल्याचे म्हणत ओवेसींनी सरकारवर निशाणा साधला. तर टी२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत काही बोलणाऱ्यांवर बाबांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तुरूंगात टाकल्याचे म्हणत ओवेसींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्या भारतीयांवर योगी आदित्यनाथ यांनी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कंगनावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल का? असा प्रश्न त्यांनी योगी आणि मोदींना विचारला. देशद्रोहाचा गुन्हा फक्त मुस्लिमांवरच लागू होतो का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.