शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना


नवी दिल्ली – पुण्यात आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. बाबासाहेब पुरंदरेंवर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, त्यांची प्राणज्योत उपचारादरम्यानच मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवशाहीर बाबासाहेबांच्या निधनावर शोक व्यक्त केला. हे शब्दांच्या पलिकडचे दु:ख असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी आणखी जोडल्या जातील. त्यांनी केलेली इतर कामेही स्मरणात राहतील, असे मोदींनी म्हटले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या विपुल कार्यामुळे नेहमी जिवंत राहतील. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


बाबासाहेब पुरंदरेंना काही दिवसांपुर्वी घरात पाय घसरून पडल्यामुळे इजा झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ते 100 वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती येथील निवासस्थानी ठेवण्यात आले आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.