संस्कृती संवर्धनासाठी कला महोत्सवांचे आयोजन राज्यभर करण्यात येणार – अमित देशमुख


मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे जतन, वहन आणि संवर्धन होण्याच्या दृष्टीने राज्यभरात कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने आयोजित कला महोत्सव २०२१च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेते नागेश भोसले, ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक राहुल रानडे आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

पूल अकादमीच्या वतीने यावर्षी राज्यातील सोळा जिल्ह्यातील कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी दिली आणि यापुढे अशी संधी प्राप्त होईल असे देशमुख यांनी यावेळी नमूद केले. या कला महोत्सवात दुर्मिळ लोककला, स्थानिक लोककला, कविसंमेलने, नाटक अशा विविध स्वरूपांच्या सादरीकरनावर भर देण्यात आला. कार्तिकी एकादशीच्या पूर्वसंध्येला आज पु ल अकादमीतर्फे सांगता समारंभात भक्ती महोत्सवचे आयोजन केले होते. यामध्ये अभंग रिपोष्ट, ओंकार भजनी मंडळ, दिंडी इत्यादीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. पांडुरंगाच्या भव्य मूर्तीची पूजा करून देशमुख यांनी राज्यातील कलाकारांना शुभेच्छा दिल्या. आषाढी आणि कार्तिकी च्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात भक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल असेही देशमुख यांनी सांगितले.कोरोनाचे संकट जरी कमी झाले असले, ते अजून टळलेले नाही त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षकांनी नियमावलीचे पालन करून कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांनी यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने कलाकारांसाठी राबवल्या जात असलेल्या योजनांची माहिती दिली. कोरोना सारख्या संकटकाळात शासन कलाकारांच्या पाठीशी असून, त्यांना आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे याचीही माहिती त्यांनी दिली. राज्यातील प्रत्येक कलाकार स्वाभिमानाने आपली कला सादर करू शकतो असे वातावरण या क्षेत्रात निर्माण झाले आहे असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते नागेश भोसले यांनी आपल्या मनोगतात, कलाना राजाश्रय मिळत असल्याबद्दल भावना व्यक्त केली. कलेला राजाश्रय मिळाला तरच कला बहरू शकेल असेही त्यांनी मत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कला अकादमीचे प्रकल्प संचालक तथा संचालक, सांस्कृतिक कार्य बिभीषण चवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक संचालक श्रीराम पांडे यांनी केले.