देशात काल दिवसभरात 10 हजार कोरोनाबाधितांची नोंद, तर 125 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्याप म्हणावे तसे कमी झालेले नाही. देशात दररोज जवळपास 10 हजार कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात 10 हजार 229 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 125 बाधितांचा मृत्यू झाला आहे. ज्यापैकी केवळ केरळमध्ये 5,848 कोरोनाबाधितांची, तर 46 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.

देशात कोरोनाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 44 लाख 47 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4 लाख 63 हजार 655 बाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, 3 कोटी 38 लाख 49 हजार नागरिक आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय बाधितांची संख्या जवळपास सव्वा लाख आहे. म्हणजेच, एकूण 1 लाख 34 हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीतील चढ-उतार कायम असून शनिवारी दिवसभरात 999 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर एक हजार 20 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर काल दिवसभरात राज्यात 49 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये बाधितांची आकडेवारी हजारांच्या आत आलेली दिसत होती. ती पुन्हा एकदा हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 64,66,913 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97.64 टक्के एवढा झाले आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.