प्रसिद्ध इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन 

प्रसिद्ध इतिहासकार, लेखक, नाटककार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे ५ वा.७ मिनिटांनी पुण्यात निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती त्यामुळे त्यांच्यावर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. गेले तीन दिवस त्यांना न्युमोनियाचा त्रास होत होता त्यामुळे त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवले गेले होते.  बाबासाहेबांचे पार्थिव त्यांच्या पुण्यातील पर्वती जवळच्या घरी सकाळी दर्शनासाठी ठेवण्यात आले असून दुपारी १२ च्या सुमारास त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी पुण्याकडे रवाना झाले आहेत असे समजते.

बाबासाहेब यांचे मूळ नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे. त्यांच्या जन्म २९ जुलै १९२२ रोजी सासवड येथे झाला होता. लहानपणापासून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राने मोहविले होते आणि त्यामुळे त्यांनी सारे आयुष्य शिवाजी राजांच्या संदर्भातील इतिहास संशोधनात घालविले. २०१५ मध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च महाराष्ट्र भूषण तर २०१९ मध्ये त्यांना भारत सरकारच्या पद्मविभूषण सन्मानाने गौरविले गेले होते. दादरा नगर हवेली संग्रामात सुद्धा त्यांचा सहभाग होता.

शिवचरित्रावर त्यांनी देश विदेशात १२ हजाराहून अधिक व्याख्याने दिली होती. अनेक ऐतिहासिक विषयांवर त्यांनी लेखन केले होते. ‘राजा शिवछत्रपती’ या त्यांच्या पुस्तकाने तर लोकप्रियतेचा इतिहास रचला. या पुस्तकाच्या १६ आवृत्त्या निघाल्या आणि ५ लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यानी लिहिलेले ‘जाणता राजा ‘ हे महानाट्य अतिशय गाजले. शेलारखिंड, महाराज, अशी त्यांची अनेक पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरली आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबासाहेबांच्या निधनाने महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीतील एक महत्वाचा साक्षीदार हरपला अश्या शब्दात यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.