गुजरातमध्ये पुन्हा एकदा 600 कोटींचे 120 किलो ड्रग्ज जप्त


मोरबी : तब्बल 120 किलो हेरॉईन गुजरात एटीएसने मोरबी जिल्ह्यातील जांजुरा गावामधुन जप्त करण्यात आले आहे. अंदाजे सहाशे कोटी रुपये याची किंमत असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरात एटीएसने ड्रग्जच्या तस्करी प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. याबाबतची माहिती राज्याचे मंत्री हर्ष सांगवी यांनी ट्विट करत दिली आहे. गुजरातमध्ये गेल्या आठवड्यात साडेतीनशे कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आले होते. महिन्याभर आधी तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रानंतर गुजरातध्येही ड्रग्जचे प्रकरण तापण्याची शक्यता आहे.

तीन हजार किलोचे ड्रग्ज अदानी समूहाकडे मालकी असलेल्या गुजरातमधील कच्छ येथील मुंद्रा पोर्टवरुन जप्त करण्यात आले होते. 9 हजार कोटी रुपये याची किंमत अंदाजे असल्याचे सांगण्यात येत आहे. या ड्रग्जची तस्करी अफगाणिस्तानमधून झाल्याचे समजते. देशभरात याप्रकरणी छापेमारी करण्यात आली. दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, गांधीधाम, मांडवी येथे एटीएसमार्फत छापेमारी करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये ड्रग्ज पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ड्रग्जची तस्करी होत असल्याचे समजते. पोलिसांकडून सापळा रचून कारवाई केली जात आहे. मुंबईनंतर गुजरातमध्ये ड्रग्जची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे.