कहाणी २४ वर्षे विमानतळावर पडून असलेल्या विमानाची

नागपूर विमानतळावर गेली २४ वर्षे सोडून दिलेले एक विमान आता एका ट्वीटर पोस्ट मुळे चर्चेत आले आहे. हे १६० सीटर बोईंग ७२०  विमान २४ वर्षापूर्वी म्हणजे १९९१ मध्ये रनवे वर सोडून दिले गेले होते ते नंतर थोडे बाजूला केले गेले होते. त्यावेळी नागपूर विमानतळावर उतरणाऱ्या सर्व विमानांच्या वैमानिकांना एक सूचना आवर्जून दिली जात असे आणि ती हे विमान रनवे शेजारी आहे तेव्हा सावधतेने उतरा अशी असे.

ट्वीटर युजर क्रिस क्रॉय याने या संदर्भात केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार त्याचे वडील विमान मेकॅनिक होते. अमेरिकेत हे २९ वर्षे जुने विमान बंद अवस्थेत बराच काळ पडून होते. तेव्हा एका माणसाने हे विमान दुरुस्त करून पुन्हा उडवीत येईल का अशी विचारणा केल्यावर क्रिसचे वडील सॅम यांनी वर्षभर खपून हे विमान दुरुस्त केले आणि तोपर्यंत यांच्या पत्नीने युएस फेडरल एव्हीएशन कडून हे विमान उडविण्याची कागदपत्रे तयार करून घेतली. अमेरिकेसाठी नाही पण भारतात हे विमान उपयोगी ठरू शकेल म्हणून सॅम, त्याचे मित्र हे विमान अमेरिकेतून दिल्लीला घेऊन येत होते तेव्हा अचानक ते बिघडले म्हणून नागपूर विमानतळावर ते उतरविले गेले आणि नंतर तेथेच सोडले गेले असे क्रिसचे म्हणणे आहे.

पण अधिक शोध घेताना असे आढळले कि हे सॅम वर्मा भारतीय आहेत, ८१ वर्षाचे आहेत आणि मध्यप्रदेशातील बैतुल येथे राहतात. त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा हे विमान भारतात अमेरिकेतून आणले गेल्याचे त्यांनी मान्य केले पण ते म्हणाले, एअर इंडियाचे वैमानिक मेहता, काही कृ मेंबर त्यावेळी त्यांच्या सोबत होते. इलेक्ट्रा टेक कार्पोरेशनचे हे विमान काउंटी एव्हीएशन ने लीज वर घेतले होते. पण ही कंपनी १९९० मध्ये बंद पडली आणि त्यांची अनेक विमाने भोपाल, मुंबई, नागपूर येथील विमानतळावर पडून होती.

कोलकाता विमानतळावर स्पाईस जेटचे बोईंग बी ७३७, मॅक्स ८ विमान असेच ३० महिने पडून होते.२ नोव्हेंबर २०१८ रोजी भारतात आलेले हे विमान १३ मार्च २०१९ पर्यंत येथे पडून होते आणि त्यापोटी कंपनीला ५.५ कोटी रुपये पार्किंग तिकीट लावण्यात आल्याची बातमी यापूर्वी आली आहेच.