या खास बैलाची किंमत १ कोटी, मालकाचा जीव कि प्राण आहे कृष्णा

बंगलोर जवळ मांड्या मल्लावली येथे भरणाऱ्या पशु मेळ्यात कृष्णा नावाचा एक बैल मेळ्याचे खास आकर्षण ठरला आहे. साडेतीन वर्षाचा कृष्णा पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी होत असून त्याच्यावर एक नजर टाकायला लोक उतावळे झाले आहेत. कृष्णा सामान्य बैल नाही. तो दुर्मिळ होत चाललेल्या हल्लीकर जातीचा बैल असून त्याची किंमत १ कोटी रुपये आहे. वास्तविक या जातीच्या बैलांच्या किमती १ ते २ लाख आहेत मात्र कृष्णा १ कोटीचा आहे याचे कारण त्याच्या विर्याला प्रचंड मागणी असून त्याचे सिरम १ हजार रुपयाला एक डोस या दराने विकले जाते. मालक बोरेगौडा यांनी कृष्णाला फक्त दाखविण्यासाठी या मेळ्यात आणले असून कृष्णा त्यांचा जीव कि प्राण आहे.

कृष्णा साडेतीन वर्षाचा असला तरी ६.२ फुट उंच, ८ फुट लांब आणि ८०० किलो वजनाचा आहे. हल्लीकर जातीची जनावरे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या जातीच्या गाईंचे दूध अतिशय पौष्टिक असते. त्यात ए २ जीवनसत्व आणि भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. या जातीची जनावरे आरोग्यसंपन्न असतात. कृष्णाचे वीर्य दर आठवड्याला काढले जाते आणि रामनगर, देवनगरी, चिकमंगळूर येथे निवडक दुकानातून ते विक्रीसाठी ठेवले जाते. या वीर्याच्या एका डोस साठी १ हजार रुपये घेतले जातात.

बोरेगौडा सांगतात कृष्णाचा मला फार अभिमान वाटतो. त्याची चांगली देखभाल केली तर तो २० वर्षे जगू शकतो. लोकांनी या जातीच्या जनावरांची पैदास वाढवावी अशी इच्छा आहे. या जातींच्या गाईचे दुध अतिशय पौष्टिक असते त्यामुळे शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे असे ते म्हणतात.