या ठिकाणी स्थायिक होण्यापूर्वी करून घ्यावी लागते अपेंडिक्सची शस्त्रक्रिया

opreation
कोणत्याही देशामध्ये किंवा शहरामध्ये स्थायिक होण्यासाठी त्या त्या ठिकाणी लागू असलेल्या नियमांची पूर्तता करणे बंधनकारक असते. त्यानंतरच त्या ठिकाणी स्थायिक होण्याची औपचारिक परवानगी मिळविता येते. पण एका विशिष्ट गावामध्ये स्थायिक होण्यासठी मात्र शस्त्रक्रिया करवून घेऊन अपेंडिक्स काढून घेणे गरजेचे आहे. ही गोष्ट अविश्वसनीय वाटत असली, तरी अगदी खरी आहे.
opreation1
‘विलास लास अॅस्त्रेला’ हे अतिशय मर्यादित मानवी वस्ती असणारे अंटार्क्टिका येथील लहानसे गाव आहे. या गावामध्ये स्थायिक होण्याची इच्छा असणाऱ्यांना शस्त्रक्रिया करवून घेऊन शरीरातील अपेंडिक्स हा अवयव काढून टाकावा लागतो. या विचित्र नियामामागे कारणही तसेच आहे. या लहानशा गावामध्ये केवळ शे-दोनशे लोक राहतात. यातील बहुसंख्य लोक चिली देशाच्या वायुसेनेचे किंवा नौसेनेचे कर्मचारी आहेत. यातील काही लोक वैज्ञानिकही आहेत. हे लोक आपापल्या परिवारांच्या समवेत या गावामध्ये राहतात.
opreation2
हे सर्व लोक एकमेकांसोबत अतिशय गुण्यागोविंदाने रहात असून, गावामध्ये राहणाऱ्या कोणालाही कोणतीही अडचण आल्यास सर्व जण मिळून सहकार्य करीत अडचणींवर मात करीत असतात. या गावाच्या आसपास दुसरी कोणतीही वस्ती नाहीच. त्यामुळेच येथे कायम शांतता नांदत असते. बहुतेक वेळी बर्फाची चादर पांघरलेल्या या गावामध्ये शीत ऋतूमध्ये पारा -४७ अंशाच्या देखील खाली उतरतो.
opreation3
या गावामध्ये एक सुपरमार्केट, एक शाळा आणि एक पोस्ट ऑफिस आहे. तसेच पैश्यांच्या देवाण-घेवाणीकरिता एक बँक आणि एक इस्पितळ देखील आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या लोकांच्या प्राथमिक गरजा भागतील अश्या सर्व सोयी येथे आहेत असे म्हणायला हरकत नाही. मग अपेंडिक्स काढून टाकण्याचा नियम का? तर या गावामध्ये इस्पितळ असले, आणि या इस्पितळामध्ये डॉक्टर असले, तरी शस्त्रक्रिया करू शकणारे सर्जन मात्र या इस्पितळामध्ये उपलब्ध नाहीत. सर्वात जवळचे सर्जिकल सेंटर या गावापासून तब्बल एक हजार किलोमीटरच्या अंतरावर आहे.

अपेंडिक्स हा अवयव फारसा उपयोगी नसल्याने आणि तो काढून टाकल्याने मानवी जीवाला कोणताही धोका उद्भविण्याची शक्यता कमी असल्याने, त्यापासून काही त्रास उद्भविण्याआधीच हा अवयव शरीरातून काढून टाकणे चांगले अशी मान्यता असल्याने या गावामध्ये स्थायिक होण्यापूर्वी ही शस्त्रक्रिया करवून घेतली जाते. अपेंडिक्स मध्ये कोणत्या कारणाने इन्फेक्शन झाल्यास किंवा अपेंडिक्सला इजा झाल्यास मनुष्याचा जीव जाण्याची भीती असल्याने, आणि या गावातील इस्पितळामध्ये शस्त्रक्रिया होण्याची सोय नसल्याने या गावामध्ये स्थायिक होण्याआधीच अपेंडिक्स काढून टाकले जावे यातच समजूतदारपणा असल्याचे येथील लोक मानतात. हा नियम आपल्याला विचित्र वाटत असला, तरी येथील लोकांसाठी हा नियम सवयीचा झालेला आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment