तुम्ही पाहिला आहे का शाकाहारी सिंह ?


जंगलाचा राजा अशी सिंहची ओळख आहे. त्याचबरोबर सिंह हा शुद्ध मांसाहारी असल्याचे आपण ऐकलेच आहे. पण सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे सिंहला मांसाहारी म्हणणारे नेटकरी देखील चक्रावले आहेत. या व्हिडीओत दिसत असलेला सिंह चक्क गवत खाताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर यावर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील खांबा भागातील गिर अभयारण्यातील व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. एका पर्यटकाला जंगल सफारी करीत असताना मोठ्या हिरवळीच्या ठिकाणी गवत खाताना चक्क एक सिंह दिसला, त्यामुळे हे अजब दृश्य त्याने तत्काळ आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सिंहाने गवत खातानाच्या या दृश्याचे सुमारे दोन मिनिटांचे छायाचित्रण झाले, याच्या शेवटी हा सिंह उलटी करतानाही दिसत आहे.

सोशल मीडियात बुधवारी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केले. पण, उपवनसंरक्षक संदीप कुमार यांनी सांगितले की, अशा प्रकारे जंगली प्राण्यांनी गवत खाणे ही बाब नेहमीची आहे यात आश्चर्य वाटण्यासाऱखे काहीही नाही. कारण, मांसाहारी प्राण्यांनी खाल्लेले कच्चे मांस जेव्हा त्यांना व्यवस्थित पचत नाही आणि त्यांचे पोट बिघडते तेव्हा ते अशा प्रकारे गवत खातात. ते गवत खाल्यामुळे उलटी करतात या प्रक्रियेद्वारे त्यांच्या पोटातील नको असलेले घटक उलटीद्वारे बाहेर पडतात. हा त्यांच्यासाठी नैसर्गिक उपाय आहे.

Leave a Comment