खुशाल द्या जांभया


एखाद्या कार्यक्रमात लोक जमले असताना कुणी जांभया देऊ लागले तर कार्यक्रमाचा मूड बदलतो. जांभई ही साधारण कंटाळा येणे, झोप येण्याचे लक्षण समजले जाते. मात्र शरीर ज्या अनेक क्रिया करत असते त्या जांभई ही शरीराने केलेली एक क्रिया आहे. जांभया देणे याकडे वेगळ्या अर्थाने बघितले जात असले तरी जांभई शरीरासाठी अनेक प्रकाराने फायदेशीर असते असे सिध्द झाले आहे. तेव्हा तुम्हाला हवे तेव्हा खुशाल जांभई द्या.

जांभई ही शरीराची अशी क्रिया आहे कि तिच्यावर नियंत्रण करता येत नाही. इतकेच नव्हे तर एखाद्याने जांभई दिली की तिची लागण शेजारी बसलेल्या माणसाला होते आणि त्यालाही जांभई येते असे अनेकदा दिसते. म्हणजे एकप्रकारे जांभई संसर्गजन्य म्हणायला हवी. जांभई आळसाशी जोडली गेली आहे. पण तिचे फायदे थक्क करणारे आहेत.


जेव्हा तुम्ही तोंड उघडून जांभई देता तेव्हा मोठ्या प्रमाणावर बाहेरची हवा शरीरात जाते आणि अधिक प्रमाणात प्राणवायू मेंदूपर्यंत पोहोचतो. ही थंड हवा मेंदूपर्यंत गेली कि मेंदूतील गरम रक्त खालच्या बाजूला अधिक वेगाने वाहते यामुळे मेंदूला थंडावा मिळतो आणि शरीराचे तापमान कमी होण्यास मदत मिळते. यामुळे मेंदू आणि शरीर शांत होतात. जांभई हा एक प्रकारचा दीर्घ श्वास आहे. यामुळे प्राणवायू अधिक प्रमाणात शरीरात जातो तसेच शरीरातील कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे फुफुसे, मेंदू, हृद्य अधिक कार्यक्षम बनते.

जांभई माणसाला अॅलर्ट बनविते. जोपर्यंत काहीतरी शारीरिक हालचाल सुरु असते तोपर्यंत माणूस झोपू शकत नाही. जांभई देताना झोप आल्याची भावना असली तरी माणूस लगेच झोपत नाही त्यामुळे आजूबाजूला काय सुरु आहे याविषयी तो आपोआप सजग बनतो. अनेकांना विमान प्रवासात उंचीवर गेल्यावर कान दुखतात. कानातील हवेचा दाब वाढल्याने हे घडते. अश्यावेळी जांभई दिली तर कानातील हवेचा दाब कमी होतो आणि कानदुखी थांबते.

मेंदूवर जर खूप ताण असेल तर बचावासाठी शरीराची पहिली प्रतिक्रिया जांभई देणे ही असते. यामुळे मेंदू टॉक्सिनफ्री होतो, ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो आणि त्यामुळे रक्तदाब वाढला असल्यास नियंत्रित होण्यास मदत मिळते परिणामी तणाव कमी होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment