ओलिव्हरिडले कासवे आणि प्लंबरसाठी प्रसिद्ध हे गाव


ओडीसातील केंद्रपाडा जिल्ह्यातील भीतरकणिका अभयारण्य जगभरातील प्राणीप्रेमींचे आवडते ठिकाण आहे कारण येथे ओलिव्हरिडले कासवे कासवे मोठ्या प्रमाणात दिसतात. कासवांसाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातील पट्टामुंडाइ या गावाला एक खास ओळख आहे ती म्हणजे प्लंबरचे गाव अशी. सध्या भारतात काम करणाऱ्या प्लंबरच्या एकूण संख्येपैकी ७० टक्के प्लंबर या गावातील आहेत. येथे दर दोन घरामागे एक प्लंबर आहे. विशेष म्हणजे हे प्लंबर इतके निष्णात आहेत कि वर्षाला ते ३० लाखांच्या घरात कमाई करत आहेत.

पट्टामुंडाइ येथील स्टेट इंस्टीटयूट ऑफ प्लंबिंग टेक्नोलॉजीचे प्रिन्सिपल निहाररंजन पटनायक या संदर्भात म्हणाले, १९३० पासून हे कौशल्य येथील लोकांनी आत्मसात केले आहे. तेव्हा कोलकाता येथे दोन ब्रिटीश कंपन्याना प्लंबरची गरज होती. केंद्रपाडा येथील तरुणांनी तेथे नोकऱ्या मिळविल्या. देशाची फाळणी झाली तेव्हा कोलकाता येथील बरेच प्लंबर पाकिस्तानात गेले त्यामुळे येथील प्लंबरना मोठी संधी मिळाली.

या गावात पिढ्यानपिढ्या प्लम्बिंगचे काम शिकले जात असून त्यात मुलीही मागे नाहीत. १९७० पासून येथून गल्फ देशात प्लंबर म्हणून नोकरीला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तेथे हे प्लंबर महिना ५० हजार ते अडीच लाखापर्यंत कमाई करतात. त्यामुळे या छोट्या गावात १४ बँकानी शाखा उघडल्या आहेत. येथील प्लंबर त्यांच्या कामात इतके निष्णात आहेत की त्यांना पंचतारांकित हॉटेल, सरकारी कार्यालये, परदेशी दूतावास येथे सहज काम मिळते. दरवषी या संस्थेतून ९६ प्लंबर शिकून बाहेर पडतात.

इंडिअन प्लंबिंग स्किल कौन्सिलच्या आकडेवारीनुसार देशात कार्यरत असलेल्या ८ लाख नोंदणीकृत प्लंबरपैकी ५.६० लाख प्लंबर केंद्रपाडा येथील आहेत.

Leave a Comment