उंच जिराफाविषयी काही मनोरंजक माहिती


निसर्गात अनेक प्रकारचे प्राणी आहेत. त्या प्रत्येकाचे काही विशेष गुण आहेत. सर्वाधिक लांब मान आणि जमिनीवरील प्राण्यात सर्वाधिक उंच असलेला जिराफ हा प्राणी भारतात आढळत नाही तरी त्याच्याविषयीची मनोरंजक माहिती वाचायला कुणाचीच हरकत नसावी.

हा प्रचंड प्राणी हत्तीप्रमाणेच शाकाहारी आहे. आफ्रिकेच्या जंगलात जिराफ प्रामुख्याने आढळतात. जिराफांच्या कळपाला टॉवर असा शब्द आहे. या अवाढव्य प्राण्याची झोप अगदी कमी असून दिवसात तो फक्त ५ मिनिटे ते अर्धा तास इतकाच झोपतो. जिराफ अगदी शांत असतात कारण त्यांना ओरडता येत नाही. काही जिराफांची मान ६ फुट लांब असते आणि पाय सुद्धा ६ फुटापेक्षा अधिक लांब असतात. म्हणजे पृथ्वीवरील बरीच माणसे जिराफाच्या पायाइतकीही उंच नसतात.

जिराफ गवत, झाडाची पाने खातात पण त्यांना पाणी फारसे लागत नाही. ते अनेक दिवसांनी एकदाच पाणी पितात. पाण्याची बहुतेक गरज गवत, झाडांच्या पानातून पूर्ण होते. पाण्याशिवाय राहणाऱ्या उंटापेक्षाही अधिक दिवस जिराफ पाण्याविना अधिक अंतर जाऊ शकतात. जिराफाच्या अंगावर आढळणारे ठसे माणसाच्या बोटांच्या ठशाप्रमाणे युनिक असतात. म्हणजे दोन जिराफांच्या अंगावर समान ठसे नसतात. जिराफाचे पाउल १ फुटांपर्यंत लांब असते.


जमिनीवरचे पाणी पिताना जिराफाला गुढग्यावर बसून प्यावे लागते. जिराफ मादीची गर्भावस्था ४०० ते ४६० दिवसांची असते. जिराफाची ५० टक्के पिल्ले पहिल्या सहा महिन्यातच बिबटे, तरस यांच्याकडून मारली जातात. जंगली कुत्री जिराफाच्या पिलांची शिकार करतात. जिराफाची जिभ २१ इंचापर्यंत लांब असते. म्हाताऱ्या जिराफांची आतडी ७० फुटापर्यंत लांब असू शकतात. नराचे वजन साधारण १२०० किलो तर मादीचे वजन ८३० किलो पर्यंत असते.

विशेष म्हणजे पांढऱ्या वाघाप्रमाणे पूर्ण पांढरे जिराफ केनियात सापडले असून त्यांचा व्हिडीओ जारी केला गेला आहे. हे जिराफ अल्बिनो म्हणजे त्वचेत रंगद्रव्याचा अभाव असलेले आणि म्हणून पांढरे आहेत.

Leave a Comment