काल दिवसभरात देशात ११,८५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद, ५५५ रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशात काल दिवसभरात ११,८५० नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर १२,४०३ कोरोनाबाधित उपचारानंतर घरी परतले आहे. यानंतर, देशातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३,३८,३६,४८३ झाली आहे. त्याच वेळी, देशात सध्या फक्त १,३६,३०८ सक्रिय रुग्ण शिल्लक आहेत. गेल्या २७४ दिवसांतील हा निचांक आहे. तर गेल्या २४ तासांत देशात ५५५ बाधितांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

तसेच देशातील सक्रिय प्रकरणे एकूण प्रकरणांपैकी एक टक्क्यांपेक्षा कमी आहेत. देशात आता ०.४० टक्के प्रकरणे शिल्लक आहेत. मार्च २०२० नंतरचा हा नीचांक आहे. दुसरीकडे, दैनिक सकारात्मकता दर ०.९४ टक्क्यांवर गेला आहे. मागील ४० दिवसांपासून तो दोन टक्क्यांपेक्षा कमी राहिला आहे. यासह, देशातील साप्ताहिक सकारात्मकता दर १.०५ टक्के आहे, जो गेल्या ५० दिवसांपासून दोन टक्क्यांच्या खाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या तीन कोटी ४४ लाख २६ हजार ३६ झाली आहे. त्याचबरोबर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ३६ हजार ३०८ वर आली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या चार लाख ६३ हजार २४५ झाली आहे.

सलग ३६ दिवस देशात कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या २० हजारांहून कमी आहेत. आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण तीन कोटी ३८ लाख २६ हजार ४८३ लोक कोरोनामुक्त झाले आहेत, तर मृत्यूचे प्रमाण सुमारे १.३० टक्के आहे. दरम्यान, देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत १११ कोटीहून अधिक करोनावरील लसीचे डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी ५८ लाख ४२ हजार ५३० डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत लसीचे १११ कोटी ४० लाख ४८ हजार १३४ डोस देण्यात आले आहेत.