कसोटी-एकदिवसीय संघाचेही कर्णधारपद सोडू शकतो विराट कोहली : रवी शास्त्री


नवी दिल्ली : भारतीय संघाच्या टी-20 संघाची जबाबदारी अनुभवी रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. विराट कोहलीने वर्कलोडचे कारण देत टी-20 चे कर्णधारपद सोडल्यानंतर आयपीएलमधील आरसीबी संघाचेही कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराटने घेतला होता. आता विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत रवी शास्त्री यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहली टी-20 संघापाठोपाठ भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही सोडण्याचा विचार करू शकेल, असे वक्तव्य भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले आहे. रवी शास्त्री यांचा भारतीय संघासोबतचा कार्यकाळ यूएई येथे झालेल्या विश्वचषकानंतर संपला आहे. त्यांच्यानंतर आता राहुल द्रविड याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.

रवी शास्त्री विराट कोहलीवरील एका प्रश्नावर बोलताना म्हणाले की, भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वात मागील पाच वर्षे कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी होता. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढणे शक्य नाही. पण कोरोना आणि बायोबबल यामुळे मानसिक थकवा जाणवत असल्यास तसेच आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे असल्यास विराट कोहली स्वत:हून भविष्यात कर्णधारपद सोडू शकेल. पण, हे नजीकच्या काळात होण्याची शक्यता कमी असल्याचे शास्त्री म्हणाले. कसोटी संघाचे दीर्घकाळ नेतृत्व करता यावे, यासाठी विराट कोहली एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होऊ शकतो, असेही शास्त्री यांनी सांगितलं.

विराट कोहलीमधील क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्याची भूक अद्याप कायम आहे. संघातील इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा विराट कोहली तंदुरुस्त आहे, यात दुमत नाही. तुम्ही जेव्हा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असता, तेव्हा तुम्ही जास्त काळ क्रिकेट खेळू शकता. विराट कोहलीचा कर्णधारपदाबाबत वैयक्तिक निर्णय असू शकतो. भविष्यात विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधापद सोडू शकतो. पण, कसोटी क्रिकेटमध्ये कायम राहू शकतो. कारण, कसोटीमध्ये विराट कोहली सर्वश्रेष्ठ कर्णधार आहे, असे शास्त्री म्हणाले.