अमरावतीमध्ये कडक निर्बंध, कलम १४४ लागू


अमरावती – महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अमरावती, नांदेड, औरंगाबादमध्ये हिंसक घटना घडल्याचे दिसून येत आहे. यात अमरातवीतमध्ये घडलेल्या हिंसाचारामुळे वातावरण अधिकच चिघळले आहे. या पार्श्वभूमीवर आता सरकारकने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार अमरावतीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले असून, जमावबंदीचे आदेश देण्यात आल्याची माहिती अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. तसेच, नागरिकांना देखील आवाहन केले आहे.

कोणीही परिस्थिती चिघळेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये किंवा सोशल मिडीया पोस्ट करू नयेत. अमरावती हे औद्योगिक शहर आहे, या जिल्हाला मोठा सांस्कृतिक-सामाजिक वारसा आहे. अमरावतीच्या लौकिकाला गालबोट लागणार नाही, याची काळजी आपण सर्व जण घेऊया, असे यशोमती ठाकूर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

आता नियंत्रणाखाली अमरावतीमधील परिस्थिती येत आहे. माझी सर्व अमरावतीकरांनी विनंती आहे, त्यांनी शांतता व संयम पाळावा. माध्यमांनी देखील दूरचित्रवाणीवर अप्रिय घटनांची दृश्ये दाखवतांना, त्यावर वेळ नमूद करावी, जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही. सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे देखील ट्विट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

काल राज्यात मुस्लिम संघटनांनी त्रिपुरात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ विविध ठिकाणी निवेदने दिली. पण काही ठिकाणी याला हिंसक वळण लागले होते, अमरावतीतही गालबोट लागले. या पार्श्वभुमिवर आज भाजपने अमरावती बंदचे आवाहन केले होते. पण भाजपच्या या बंदच्या आवाहनाला हिंसक वळण लागले. आक्रमक आंदोलकांनी दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला.