प्रियंका गांधींची अमित शहांवर उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन टीका


लखनौ – २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका उत्तर प्रदेशमध्ये होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी केली आहे. उत्तर प्रदेशमधील नेत्यांच्या भेटी वाढल्या असून काँग्रेस, भाजपसह इतर पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येत आहे. यातच शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर उत्तर प्रदेशातील कानपूरमधील काही गुन्ह्यांच्या घटनांवरून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे. अमित शहा दागिने घालून निघण्याचा जुमला देतात, पण हे फक्त राज्यातील महिलांनाच माहीत आहे की त्यांना दररोज कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो.

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये, देशाचे गृहमंत्री दागिने घालून निघण्याचा जुमला देतात, परंतु रोज कोणत्या प्रकारच्या गोष्टींना सामोरे जावे लागते, हे फक्त उत्तर प्रदेशच्या महिलांनाच माहीत आहे. म्हणूनच मी एक मुलगी आहे, मी लढू शकते, हे या राज्यात आवश्यक आहे. जेणेकरून महिलांचा राजकारणात आणि सुरक्षेशी संबंधित धोरणे बनवण्यात सहभाग वाढेल.

नुकतेच उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कौतुक केले होते आणि म्हटले होते की, आज १६ वर्षांची मुलगी देखील रात्री १२ वाजता दागिने घालून उत्तर प्रदेशच्या रस्त्यावरून फिरू शकते, एवढे राज्य सुरक्षित आहे. प्रियंका गांधी यांनी शहा यांच्या याच वक्तव्यावरून टोला लगावला आहे.