आता इराणी आणि त्यांच्या पक्षाने महागाई कमी करण्यासाठी आंदोलन करावे, आम्ही पाठिंबा देऊ – संजय राऊत


औरंगाबाद – शिवसेनेकडून औरंगाबादेत महागाईविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत देखील या मोर्चात हजर होते. आमचेच सरकार मंत्रालयात आणि शिवसेना रस्त्यावर, असे संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले. महागाई ही राष्ट्रीय समस्या असून राज्य सरकारच्या हातात पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणे नाही, पेट्रोलियम कंपन्या महाराष्ट्र सरकारच्या मालकीच्या नसल्यामुळे दर कमी करणे हे केंद्र सरकारचे काम असल्याचे संजय राऊत म्हणाले.

राऊतांनी शिवसेनेचा महागाई विरोधातील मोर्चा ढोंग असल्याच्या आरोपांना यावेळी बोलताना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, काँग्रेसची सत्ता केंद्रात असताना आत्ताच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सिलेंडर घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या. इराणी आणि त्यांच्या पक्षाने आता महागाई कमी करण्यासाठी आंदोलन करावे, आम्ही पाठिंबा देऊ, असे ते म्हणाले. उज्वला योजनेतील अनेक सिलेंडर भंगारात निघाल्याचेही राऊत म्हणाले. देशातील १७ हजार लहान व्यावसायिकांनी महागाईला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत, पण १८ हजार कोटींचे विमान घेऊन मोदी स्वतः फिरत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

राज्य सरकारची आर्थिक कोंडी केंद्र सरकार करत आहे. भाजपची सरकार पाडण्यासाठी रोज कारस्थाने सुरू आहेत. महागाईबद्दल भाजपचे लोक बोलत नाही. त्रिपुऱ्यात घडलेल्या कोणत्यातरी घटनेसाठी भाजप महाराष्ट्रात आंदोलन करत असल्याची टीका संजय राऊतांनी केली. महागाई १०० दिवसात कमी करण्याचे वचन दिले होते, पण तुमचे सरकार येऊनही तुम्ही महागाई कमी केलेली नाही. महागाई बद्दल विचारल्यावर भारत-पाकिस्तान, सर्जिकल स्ट्राईक, भारत-चीनबद्ल बोलतात आणि मुळ मुद्दा बाजूला ठेवतात, असा आरोप राऊतांनी भाजपवर केला आहे.