नवमतदारांनी मतदार नोंदणी कार्यक्रमात सहभागी व्हावे – मुंबई शहर जिल्हाधिकारी


मुंबई : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2021 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सदर कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करणे/ मतदारांच्या नाव, पत्ता, फोटो यामध्ये दुरुस्ती करणे आणि मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची वगळणी इ. बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदार, महिला आणि समाजातील वंचित घटकांतील मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी 13 व 14 नोव्हेंबर, 2021 आणि 27 व 28 नोव्हेंबर, 2021 रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

तरी मुंबई शहर जिल्ह्यातील नव मतदारांनी व नागरिकांनी जवळच्या पदनिर्देशित ठिकाणी अथवा www.nvsp.in या वेबसाईट वर अथवा व्होटर हेल्पलाईन अॅपद्वारे मतदार यादीत आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन राजीव निवतकर, जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेसाठी मुंबई मतदारसंघाकरिता द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने मुंबई मतदारसंघाकरिता दोन सदस्यांची मुदत दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी समाप्त होत असल्याने बृहन्मुंबईत दिनांक 9 नोव्हेंबर 2021 पासून तात्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्यांपैकी सर्वश्री रामदास गंगाराम कदम आणि अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी मुदत समाप्त होत आहे. त्यास्तव सदर निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021 (मंगळवार), नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021 (मंगळवार), नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 (बुधवार), उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार), मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021 (शुक्रवार), मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत, मतमोजणीचा दिनांक – 14 डिसेंबर 2021 (मंगळवार) आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 16 डिसेंबर 2021 (गुरूवार).

आयोगाने नमूद केल्याप्रमाणे कोविड-19 संदर्भातील विस्तृत मार्गदर्शक तत्वे तसेच यासंदर्भात अलीकडेच दिनांक 28 सप्टेंबर 2021 च्या मार्गदर्शक सूचनांमधील परिच्छेद क्र.6 येथे नमूद केलेल्या सूचनांचे निवडणूक प्रक्रियेत भाग घेणाऱ्या व्यक्तींनी पालन करणे आवश्यक असल्याचेही श्री.निवतकर यांनी सांगितले.