खासदार अमोल कोल्हेंनी स्पष्ट केली ‘एकांतवासा’मागील कारणे


पुणे – काही काळासाठी संपर्कात नसल्याचे सांगत एकांतवासात जात असल्याची पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले. मागील वर्षभरात काही टोकाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये सांगत त्यावर फेरविचार करणार असल्याचेही नमूद केले. त्यामुळे त्यांच्या राजकीय संन्यासापासून पक्षांतरापर्यंत तर्कवितर्क लावण्यात आले. पण आता अमोल कोल्हे यांनीच स्वतः समोर येऊन त्यांच्या एकांतवासामागील कारणे स्पष्ट केली आहेत. त्यांनी ट्विट करत याची माहिती दिली.

अमोल कोल्हे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, ७ नोव्हेंबरला मी सोशल मीडियावर माझ्या एकांतवासाविषयी एक पोस्ट केली. त्यानंतर चर्चेला उधाण आले. माझ्या एकांतवासाविषयी सर्वजण करत असलेली चर्चा, लावत असलेले तर्क पाहिल्यानंतर या एकांतवासाविषयी मीच उलगडा करण्याचे ठरवले. एकांतवास, सिंहावलोकन, आत्मचिंतन, फेरविचार, मानसिक थकवा या शब्दांचा बराच उहापोह या पोस्टच्या निमित्ताने झाला. काही जणांनी सहमती दाखवली, काही जणांनी सहानुभुती दाखवली, काहींनी टीका केली. काहींनी तर थेट राजकीय संन्यासाचा तर्क लावला. काहींच्या कल्पनेची भरारी थेट राजकीय पक्षांतरापर्यंत गेली.


मानसिक आरोग्याच्या जाणीवेची मला गरज अधोरेखित झाली. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला येऊ शकणारा आणि येऊनही दुर्लक्षिला जाणारा मानसिक थकवा ही मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटते. ऐन तिशीतील तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, पस्तीशीत मधुमेहाची सुरुवात अशा अनेक गोष्टी आपल्या कानावर येतात. ह्रदय विकार, मधुमेह, डोकेदुखी, पोटाचे आजार ते मानसिक विकार, अस्थमा अशा अनेक आजारांचे मूळ कारण मानसिक तणाव हे आहे. लोक प्रतिनिधी, अभिनेता म्हणून नाही तर डॉक्टर या नात्याने मी हे सांगत असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

अमोल कोल्हे पुढे म्हणतात, लहानपणापासून आपल्याला शिकवलेले असते, तू कणखर आहेस, तू रडायला नको, पुरुषांनी कधी रडायचं नसते, आपल्या भावना पुरुषांनी सार्वजनिकपणे व्यक्त करायच्या नसतात. या सर्व संस्कारातून एक गैरसमज रुढ होतो. तो म्हणजे पुरुषांनी भावनिकदृष्ट्या हळवेपणाने व्यक्तच व्हायचे नाही. पुरुषांना लहानपणापासून व्यक्त होण्याचा एकच उपाय दिसतो, तो म्हणजे आक्रमकता. उचल हात, कर भांडण, वाटले तर हासड शिवी. नागरिकरणाच्या अनेक टप्प्यांवर पुरुषप्रधान संस्कृती स्वीकारली गेली असेल, त्यामुळे हे अनेक पिढ्या चालू असेल.

जग हळूहळू बदलू लागले, स्पर्धात्मक होऊ लागले. सुरुवातील निकोप असणारी ही स्पर्धा बदलली. त्यानंतर स्वप्न, महत्वकांक्षा आणि गरज या तीन गोष्टींमधील सीमारेषाच पुसट झाली. प्रत्येकजण धावू लागला आणि कुणासाठी धावतो आहे हेच माणूस विसरला. माणूस स्वतःसाठी, कुटुंबासाठी, मित्रांसाठी समाजासाठी धावतो आहे का? की इतर लोक हसतील या भितीपोटी धावतो आहे? मानसिक तणावामुळे अनेक व्याधी डोके वर काढतात, असेही त्यांनी सांगितले.

म्हणूनच व्यक्त व्हा, मोकळे व्हा, असे सांगतो. कुणी याला कमकुवतपणा, मानसिक कणखरतेचा अभाव आहे, असे म्हणेल. पण ही बेगडी विशेषणे आहेत. तुम्हाला त्याने काहीही फायदा होणार नसल्यामुळेच व्यक्त होणे हे जीवंतपणाचे आणि संवेदनशीलतेचे लक्षण आहे. आजच्या काळात ते जास्त महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अमोल कोल्हे पुढे म्हणतात, मला माझे एक मित्र म्हणाला थकवा सर्वांनाच येतो, जाहीरपणे सांगण्याची काय गरज होती? यामागे माझी एक प्रामाणिक भावना आहे. लोकप्रतिनिधी किंवा सेलिब्रेटी यांचे काही प्रमाणात अनुकरण केले जाते. हे खरे असेल तर माझे याबाबतीत अनुकरण केलेले मला आवडेल. मानसिक थकवा स्विकारण्यातून आणि तो दूर करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नातून ऐन तारुण्यात होणारा ह्रदय विकाराचा एक जरी मृत्यू वाचला तरी या सगळ्याचे चीज झाले, असे मला वाटते.

मी काय विचार या एकांतवासात केला, काय निर्णय घेतला हे येणाऱ्या भविष्य काळात तुम्हाला समजेलच. आपली वैचारिक बैठक पक्की करण्यासाठी, ध्येय निश्चितीसाठी आणि तो मार्ग ठरवण्यासाठी अंतर्मुख होणे गरजेचे असते. तसाच मी काही काळ अंतर्मुख होतो. आता नव्या जोशाने पुन्हा सिद्ध झालो आहे. यात व्यक्त होण्याचे माध्यम सापडले. ते म्हणजे स्वतःचे यूट्यूब चॅनल अमोल ते अनमोल हा चॅनल सबस्क्राईब करा, असे आवाहनही अमोल कोल्हे यांनी केले.