किरण गोसावीची साथीदार कुसुम गायकवाडला आर्थिक फसवणूक प्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी


पुणे – किरण गोसावी आर्थिक फसवणूक प्रकरणी अटकेत असून, लष्कर पोलिसांना त्याची साथीदार कुसुम गायकवाड हिला अटक करण्यात यश आले आहे. न्यायालयामध्ये तिला हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

किरण गोसावी याने पुण्यातील कसबा पेठ भागात राहणार्‍या चिन्मय देशमुख या तरुणाची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याची घटना २०१८ मध्ये घडली होती. त्या प्रकरणी चिन्मय याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर त्याचा शोध सुरू होता. त्याच दरम्यान आर्यन खान ड्रग्स प्रकरणी पंच म्हणून किरण गोसावी राहिला आणि त्यावेळी आर्यन सोबतचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तो फोटो चिन्मय देशमुख याने पाहताच, त्याने पोलिसाकडे तक्रारी केली व तोच आरोपी असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा किरण गोसावीचा पोलीस शोध घेत असताना, त्याला कात्रज येथून अटक करण्यात आली. न्यायालयामध्ये किरण गोसावीला हजर केल्यावर वेळोवेळी तपास कामानिमित्त पोलीस कोठडीमध्ये वाढ झाली.

दरम्यान किरण गोसावी विरोधात राज्यातील ९ ठिकाणी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील सुरुवातीला फरासखाना प्रकरण सुरू होतेच, लष्कर आणि वानवडी प्रकरणी यापैकी कोणी तरी किरण गोसावी याचा ताबा घेणार हे निश्चित मानले जात असताना. त्याचा ताबा लष्कर पोलिसांनी घेऊन लष्कर न्यायालयामध्ये हजर केल्यावर त्याला आठ दिवसांची पोलिस सुनावण्यात आली. तर त्याला साथ देणारी महिला कुसुम गायकवाड हिचा शोध सुरू असताना, तिला वाकड येथून अटक करण्यात आली. आज तिला न्यायालयात हजर केल्यावर पोलिसांनी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली. पण तीन दिवसाची कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.