स्वातंत्र्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर कंगनाची प्रतिक्रिया


आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना राणावत कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर कंगना मोकळेपणाने तिचे मत मांडताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. कंगनाच्या वक्तव्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे. त्याचबरोबर तिला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्याची मागणीही केली जात आहे. कंगनाने या संपूर्ण वादानंतर तिच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच १९४७ मध्ये काय घडले हे कोणी सांगितले, तर ती तिचा पद्मश्री पुरस्कार परत करेल असे म्हटले आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून कंगनाने ही पोस्ट शेअर केली आहे. या मुलाखतीत स्पष्टपणे सांगण्यात आले की स्वातंत्र्यासाठी पहिले संघटित युद्ध हे १८५७ मध्ये लढले गेले. मला १८५७ ची माहिती आहे, पण १९४७ मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहित नाही. कोणी या प्रकरणावर जर मला माहिती दिली, तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन… कृपया मला मदत करा, असे कंगना म्हणाली आहे.

कंगना पुढे म्हणाली, शहीद राणी लक्ष्मीबाई सारख्या चित्रपटात मी काम केले आहे. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यावर बरेच संशोधन झाले आहे. राष्ट्रवादासोबत दक्षिणपंथाचा उदय झाला, पण ते अचानक नष्ट कसे झाले? आणि गांधींनी भगत सिंग यांना का मरू दिले… शेवटी, नेता सुभाषचंद्र बोस यांची हत्या का झाली आणि त्यांना गांधीजींचा पाठिंबा कधीच मिळाला नाही. इंग्रजांनी विभाजन का केले? भारतीय स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याऐवजी एकमेकांना मारत होते. मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, ज्यासाठी मला मदत हवी आहे.

कंगना पुढे म्हणाली, त्या संपूर्ण मुलाखतीत मी कोणत्या शहीदाचा किंवा कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान केला आहे, हे जरी दाखवले, तरी मी माझा पद्मश्री परत करेन. मुलाखतीतल्या छोट्या छोट्या क्लिप व्हायरल करण्यात काही अर्थ नाही. कृपया संपूर्ण वाक्य दाखवा आणि पुढे येऊ सगळे सत्य सांगा. मी सगळे परिणाम भोगण्यासाठी तयार आहे. पुढे तिच्या वक्तव्यावर होणाऱ्या परिणाम भोगण्यासाठी तयार असल्याचे म्हणत कंगणा म्हणाली, जो पर्यंत २०१४ मध्ये मिळालेले स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. तर मी म्हणाली होती की आपल्याकडे दाखवण्यासाठी स्वातंत्र्य असले तरी भारताच्या चेतनेला आणि विवेकाला २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा एक मृत असलेली सभ्यता जिवंत झाली आणि त्या सभ्यतेने पंख पसरले आणि आता ती सभ्यता जोरात गर्जना करत आहे. आज पहिल्यांदा लोक इंग्रजी न बोलता किंवा छोट्या शहरातून आलेले किंवा मेड इन इंडिया उत्पादन बनवल्याबद्दल आपला अपमान करू शकत नाही. त्या मुलाखतीत सगळ्या गोष्टी स्पष्ट आहेत. लेकिन जो चोर हैं उनकी तो जलेगी कोई बुझा नहीं सकता। जय हिंद…