आपले कुठे चुकले आणि कुठे कमी पडलो त्याचे आत्मपरिक्षण करा. त्यातून बोध घ्या ; अजित पवारांचा फडणवीसांना टोला


नगर – निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कामाचा धडाका सुरू केला आहे. सुमारे २३० कोटी रुपयांची विविध विकास कामे कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांत मिळून होणार आहेत. शनिवारी या कामांचे भूमिपूजन पार पडले आहे. अजित पवार, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि दत्ता भरणे यांच्या कर्जत-जामखेडमधील विविध विकास कामांचा हस्ते शुभारंभ झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

निवडणुका समोर ठेवून काही लोकांनी काही तरी थातुरमातुर सांगण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक वर्षांपासून जामखेडमध्ये पिण्याच्या पाण्याची मागणी होती. जास्त दाबाने पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एकनाथ शिंदे आणि मी प्रयत्न केला. रोहित पवार यांनी पाठपुरावा केली आणि आता आपण ही योजना मार्गी लावली आहे. मागे लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असताना त्यावेळचे मुख्यमंत्री येथे आले होते. एक कागद त्यांनी दाखवला आणि सांगितले तत्वतः तुमची योजना मंजूर केली आहे. तत्वतः म्हणजे काय? एकदा योजना मंजुर तरी करायला हवी किंवा मंजुर करणार आहोत, असे सांगितले पाहिजे. अनेक वर्षे मी पण काम करत आहे. पण तत्वतः म्हणजे काय? काहीतरी लोकांची दिशाभूल करुन वेळ मारून न्यायचे काम केले, असे अजित पवार यांनी म्हटले.

अजित पवार यांनी यावेळी कर्जत जामखेडचे माजी आमदार राम शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. जे काम ज्यांनी केले आहे त्यांना त्याचे श्रेय दिले पाहिजे. आमदारांचा निधी आम्ही चार कोटी केला. पण खासदारांचा निधी केंद्राने बंद केला होता. आधीच्या आमदारांच्या कामाचा दर्जा चांगला नव्हता. त्यामुळे केलेले काम अडचणीत येत होते. आज रोहित पवार प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून या कामांसाठी निधी देण्याचे काम आपण करत आहोत. यामध्ये मागच्या आमदारांनी सांगितले, हे माझ्या काळात झाले आहे, तर यात काही तथ्य नाही. त्या त्या वेळेत कामे करावी लागतात. निधी द्यावा लागतो. १० वर्षे तुम्ही आमदार असताना केलेली कामे दिसत आहेत. पण आता रोहित पवार जी कामे करत आहे, त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालला आहे. आता जरा गपगुमान बसा. आता लोकांनी थांबवलेले आहे, ते मान्य करावे. आपले कुठे चुकले आणि कुठे आपण कमी पडलो त्याचे आत्मपरिक्षण करा. त्यातून बोध घ्या, असे अजित पवार म्हणाले.