तैवानसाठी चीनविरोधात अमेरिका, युरोपियन युनियनसोबतच आता ऑस्ट्रेलियाचीही उडी!


सिडनी – भारतीय उपखंडातील शेजारी प्रांत तैवानवरून गेल्या महिन्याभरापासून वातावरण तापू लागले आहे. सातत्याने तैवानवर आपला हक्क चीनने सांगितला आहे. पण, चीनने गेल्या महिन्याभरात तैवानबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. तैवानकडून देखील सातत्याने चीनच्या आक्रमणाची शक्यता आणि भिती वर्तवली जात आहे. तैवानला या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर चीनविरोधात वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. एकीकडे युद्ध झाल्यास चीनच्या विरोधात तैवानच्या बाजूने उतरणार असल्याचे अमेरिका आणि युरोपियन युनियनने जाहीर केलेले असतानाच आता ऑस्ट्रेलियाचा देखील त्यामध्ये समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डटन यांनी ही घोषणा केली आहे.

भारतासह जागतिक स्तरावर अनेक देश तैवानची स्वायत्तता धोक्यात येऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात चीनला जागतिक पातळीवरून अनेकदा इशारे देखील देण्यात आले आहेत. पण, तरीदेखील चीनने आपली भूमिका कायम ठेवल्यामुळे आता तैवानला पाठिंबा वाढू लागला आहे. अमेरिका, युरोप आणि आता ऑस्ट्रेलिया हे बलाढ्य देश तैवानच्या बाजूने आल्यामुळे आता चीनकडून देखील मोठ्या हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकेने या परिस्थितीत जर आक्रमक हालचाली करण्याचा निर्णय घेतला, तर सध्याच्या परिस्थितीत आम्ही अमेरिकेला पाठिंबा देणार नाही हे अकल्पित असल्याचे डटन म्हणाले. सर्व बाजूंचा विचार या प्रकरणात केला तर आक्रमक भूमिका घेण्याचा पर्याय आम्ही न स्वीकारण्याची शक्यता आहे, पण अशा प्रकारची परिस्थिती उद्भवेल असे मला वाटत नसल्याचे डटन यांनी नमूद केले.

चीनने जर आक्रमक भूमिका घेतली, तर अमेरिका आणि सहकारी देश आक्रमक भूमिका घेतील, असा स्पष्ट इशारा बुधवारी अमेरिकेचे गृहमंत्री अॅंथनी ब्लिंकन यांनी दिला आहे. डटन याविषयी बोलताना म्हणाले, तैवानमध्ये जाण्याचा आपला निर्धार चीनने वारंवार बोलून दाखवला असल्यामुळे अशा परिस्थितीसाठी आपण पूर्णपणे तयार असू याची काळजी घ्यायला हवी.