देवेंद्र फडणवीसांची अमरावतीमधील हिंसक घटनांवर संतप्त प्रतिक्रिया


मुंबई – अमरावतीमधील बंदला आज सकाळपासून लागलेल्या हिंसक वळणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काही ठिकाणी रझा अकादमीने पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले. अमरावतीमध्ये अशाच प्रकारे आज मोर्चामध्ये दगडफेक आणि तोडफोड झाल्यानंतर हा मोर्चा हिंसक वळणावर गेला. त्यानंतर पोलिसांना लाठीचार्ज करून जमावाला नियंत्रणात आणावे लागले. यावरून भाजपवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला असताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीमधील संपूर्ण प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

त्रिपुरामध्ये अशी कोणती घटनाच घडली नसल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे. त्रिपुरामध्ये मशीद जाळण्यात आल्याच्या प्रकरणाचा निषेध म्हणून हे मोर्चे काढले जात असल्याचे सांगितले जात आहे. फडणवीस त्यावर बोलताना म्हणाले, अमरावतीमधील एकूणच घटनाक्रम अस्वस्थ करणारा आहे. पहिल्यांदा सर्वांना विनंती करतो की अमरावतीत शांतता प्रस्थापित करावी. कुणीही हिंसाचार करू नये. पण महाराष्ट्रात ज्या प्रकारचे मोर्चे निघाले, हे एक सुनियोजित षडयंत्र वाटते. जी घटनाच त्रिपुरामध्ये घडली नाही, त्या घटनेवर अशा प्रकारचे मोर्चे काढणे अत्यंत चुकीचे आहे.

चुकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून हा सगळा प्रकार घडवण्यात आल्याचे हे षडयंत्र असल्याचा दावा यावेळी फडणवीसांनी केला. त्रिपुरा सरकार आणि त्रिपुरा पोलिसांनी स्वत: जी मशीद जाळली होती म्हणून ही सगळी आंदोलने होत आहेत, त्या मशिदीचे फोटो जारी केले आहेत. शिवाय सोशल मीडियावर कशा प्रकारे हे खोटे फोटो टाकण्यात आले, हे देखील प्रकाशित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर पेटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित लोकांवर कारवाई देखील केली असल्याचे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अफवांवर विश्वास ठेऊन मोर्चे काढतानाच हिंदूंची दुकाने टार्गेट करणे चुकीचे असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळण्यातच आलेली नाही. असे असताना त्या अफवांवर महाराष्ट्रात मोर्चे काढायचे आणि त्यावर हिंदूंची दुकाने जाळायची हे देखील योग्य नाही. यावर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. स्टेजवर जाऊन सरकारी पक्षाचे नेते भडकवणारी भाषणे करणार असतील, तर या दंगलींची जबाबदारी सरकारवर येणार आहे. त्यामुळे कुणीही महाराष्ट्रात दंगल करू नये आणि अशा प्रकारे मोर्चे काढून विनाकारण हिंदूंची दुकाने टार्गेट करणे हे देखील बंद झालं पाहिजे आणि दोन्ही समाजांनी शांतता पाळली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.