राज्यातील हिंसक घटनांवरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया


पुणे – अल्पसंख्याकांवर त्रिपुरा येथे झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यात शुक्रवारी पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. वाहने आणि दुकानांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. त्यानंतर भाजपने शनिवारी पुन्हा अमरावतीमध्ये बंदचे आवाहन केले होते. नागरिकांनी दुकाने बंद ठेवली असतानाही मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर उतरला आहे. या दुकानांवर आक्रमक आंदोलकांनी दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाच टक्के मुस्लीम त्यांच्या नेत्यांच्या चिथावणीला बळी पडून हिंसक आंदोलन करतात, तुम्ही त्यावर टीका पण करणार नाही का? प्रत्येक विषयात तुम्हाला भाजपच दिसते. आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेली. एसटी कामगारांवर एवढा अमानवीय अन्याय महाराष्ट्राराने कधी पाहिला नाही. यामध्ये भाजपचा हात असेल, तर तुम्ही तिघे समर्थ आहात, भाजपचा हात कापून काढण्यासाठी. तुम्ही तिघे एकत्र असूनही दुबळे आहात आणि आम्ही श्रेष्ठ आहोत, असे तुम्हाला म्हणायचे आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

सरकारला यामध्ये अपयश येत नाही. सरकारने हे थांबण्याचा प्रयत्न केला तर मते जातील. राजकारणात आल्यावर याचे गणित कळेल. आजारपणातून गृहमंत्री बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये आहेत. पण सरकार बाहेरून चालवणारे असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

अमरावतीमध्ये त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध करायचा. अशी परंपराच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा परदेशात घटना घडली की कोलकातामध्ये दंगल व्हायची. लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण शांततेने करा. अमरावतीमधील कालच्या घटनेचा रिपोर्ट पोलिसांनी प्रामाणिकपणे द्यावा. माजी मंत्र्यांचे सामान्य माणसांची ऑफिस फोडली गेली. त्यामुळे भाजपने नागरिकांच्या इच्छेमुळे बंदचे आवाहन केले होते. आज पोलीस लाठ्या चालवतील, पण जी दुकाने काल फोडली त्यांच्यावर लाठ्या नाही चालवल्या, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.