तुरुंगात विवाह करणार ज्युलियन असांजे आणि स्टेला मॉरीस

ब्रिटीश सरकारने विकीलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे आणि त्याची मैत्रीण स्टेला मॉरीस यांना तुरुंगात विवाह करण्याची परवानगी दिली आहे. हे दोघे बेलमार्श तुरुंगात लग्न करणार आहेत. २०१५ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला असून या जोडप्याला दोन मुले आहेत. या दोन्ही मुलांचा जन्म असांजे लंडन स्थित इक्वाडोरच्या दुतावासात आश्रयास होता तेव्हा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटन जेल सेवा विभागाने असांजे याचा विवाहासंदर्भातील अर्ज स्वीकारला आहे. त्याच्या अर्जावर अन्य कैद्यांप्रमाणेच जेलर कडून विचार केला गेला आणि मग मंजुरी दिली असे समजते. यावर असांजेची वधू स्टेलाने पुढे लग्नात काही अडचण येणार नाही अशी आशा व्यक्त केली आहे.

ब्रिटनच्या कायद्यानुसार तुरुंगातील कैद्यांना १९८३ पासून विवाह कायद्यानुसार तुरुंगातच लग्न करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र विवाहाचा खर्च त्यांना स्वतः करावा लागतो. त्यासाठी जनतेचा पैसा वापरता येत नाही. स्टेला आणि ज्युलियन यांची ओळख २०११ मध्ये झाली होती. स्टेला असांजेच्या लीगल टीम मध्ये काम करत होती आणि ती असांजेला लंडन मधील इक्वाडोर दुतावासात रोज भेटायला येत असे. असांजेने त्याच्या दोन्ही मुलांचा जन्म व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पाहिला होता.