जगात १ हजार वर्षानंतर प्रथमच दिसणार दीर्घ खंडग्रास चंद्रग्रहण
पुढच्या आठवड्यात एका अद्भुत खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्याची संधी पृथ्वीवासियांना मिळणार आहे. जगात १ हजार वर्षाच्या कालखंडानंतर प्रथमच दीर्घ काळासाठी खंडग्रास चंद्रग्रहण पाहता येणार असून यापूर्वी असे दीर्घकालीन ग्रहण १८ फेब्रुवारी १४४० मध्ये दिसले होते असे सांगितले जात आहे. त्याचबरोबर असे दीर्घकालीन चंद्रग्रहण पाहण्यासाठी ८ फेब्रुवारी २६६९ सालची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
१८ व १९ नोव्हेंबर रोजी भारतासह पूर्ण जगभर हे खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. नासाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार खंडग्रास ग्रहणात पृथ्वीची थोडी सावली चंद्रावर पडते. ही सावली काही तास राहते. हवामान चांगले असेल तर जेथे चंद्र उगवेल तेथे हे दृश्य पाहता येणार आहे. हि सावली ६ तास २ मिनिटे इतका काळ दिसणार आहे.
भारतात मात्र ग्रहण कमी वेळ दिसणार आहे. अरुणाचल, आसाम आणि दिल्ली मध्ये काही वेळ हे ग्रहण दिसेल. कारण हे ग्रहण १२ वा.४८ मिनिटांनी सुरु होणार असून १९ नोव्हेंबरला ४.१६ वाजेपर्यंत राहणार आहे. वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण आहे. या काळात चंद्र लाल दिसेल. हे ग्रहण जगात आफ्रिका, प.युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, अटलांटिक आणि पॅसीफिक महासागर क्षेत्रात दिसणार आहे. पुढचे चंद्रग्रहण नोव्हेंबर २०२२ मध्ये आहे आणि ते खग्रास आहे.