जय श्रीराम म्हणणाऱ्यांविषयी राशिद अल्वी यांनी केलेल्या विधानावरून निर्माण झाला वाद


नवी दिल्ली – काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील हिंदुत्वाचे विश्लेषण गुरुवारी वादात सापडलेले असतानाच काँग्रेसचे अजून एक नेते राशीद अल्वी यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलेले वक्तव्य वादात सापडले आहे. जय श्री राम अशी घोषणा देणारे सगळे मुनी नाहीत, तर राक्षस असल्याचे ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद सुरू झाला असून भाजपकडून यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेण्यात आला आहे. सलमान खुर्शीद आणि राशीद अल्वी यांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेस पक्ष मात्र टीकेच्या केंद्रस्थानी आला आहे.

राशीद अल्वी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ भाजप नेते अमित मालवीय यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. राशीद अल्वी या व्हिडीओमध्ये जय श्री रामची घोषणा करणाऱ्यांविषयी मत मांडताना दिसत आहेत. जय श्रीरामची घोषणा जे देतात, ते सगळे मुनी नाहीत, तर राक्षस आहेत. अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे राशीद अल्वी म्हणाले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याची खातरजमा झाली नसली, तरी अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल होऊ लागला आहे.


दरम्यान, अमित मालवीय यांनी राशिद अल्वी यांचा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांच्यावर टीका केली आहे. सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राशिद अल्वी जय श्रीराम म्हणणाऱ्यांना निशाचर म्हणत आहेत. राम भक्तांच्या बद्दल काँग्रेसच्या विचारांमध्ये किती विष मिसळले आहे, असे मालवीय या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनीही राशिद अल्वींच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. रामावरून राजकारण केले जाऊ नये. रामाच्या अनुयायांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. लोक याचे सडेतोड उत्तर देतील. रामभक्तांविषयी केलेली अशी वक्तव्य चुकीची असल्याचे ते म्हणाले.